मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी मागच्या काही दिवसांपासून दाबून ठेवलेली खदखद अखेर बोलून दाखवली. शिवसेनेचे मंत्री अनिल परब (Anil Parab), उदय सामंत (Uday Samanat) यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला. 'अनिल परब शिवसेनेचे गद्दार आहेत. ते रत्नागिरीत शिवसेना, माझे आणि माझ्या मुलाचे राजकीय कारकीर्द संपवण्याचा घाट घालत आहे, ते रत्नागिरीतील मतदारसंघ आणि नगरपंचायती राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप रामदास कदम यांनी केला. याच वेळी त्यांनी शिवसेना संपणाऱ्यांवर आवरा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कळकळीचे आवाहनही केले आहे.
रामदास कदम म्हणाले, अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्री असूनही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी सोडता ते कधीही जिल्ह्यात येत नाहीत, त्यांचे जिल्ह्याकडे लक्ष नाही. रत्नागिरीतील मतदार संघ आणि नगरपंचायती राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघाले आहेत. ते दापोली-मंडनगड इथल्या स्थानिक नेत्यांना डावलून राष्ट्रवादीतुन आलेल्या नेत्यांना संधी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेना संपवण्यासाठीच परबांनी आमदारांना जिल्हा निधी देणार नसल्याचे जाहीर केले, असाही आरोप कदम यांनी परबांवर केला.
रामदास कदम पुढे म्हणाले, मला विश्वास आहे, या सगळ्या गोष्टींची उद्धव ठाकरेंना कल्पना नसणार. पण हा सगळा प्रकार उद्धव ठाकरेंच्या कानावर घालण्यासाठी माझा मुलगा आणि आमदार योगेश कदम हे रश्मी ठाकरेंशी बोलले. ते आदित्य ठाकरेंशीही बोलले. मी स्वतः सुभाष देसाई, अनिल देसाई यांच्याशी बोललो. पण अनिल परबांशी बोलण्यास सांगितले. योगेश कदम अनिल परबांशीही बोलले, पण ते म्हणजे राष्ट्रवादीचा नेता असल्यासारखे बोलत होते. उदय सामंत यांच्याशीही आम्ही बोललो, पण सगळीकडेच आमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असेही कदम म्हणाले.
बाळासाहेबांच्या शपथेवर सांगतो....
ज्या कथित ऑडिओ क्लिपमुळे वाद सुरु झाला आहे, त्यावर रामदास कदम यांनी आज खुलासा केला. दापोलीतील मुरूड समुद्रकिनाऱ्यावरील त्यांचा रिसॉर्ट बेकायदेशीररित्या बांधल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. या प्रकरणाचे पुरावे रामदास कदम यांनीच किरीट सोमय्यांना दिल्याची शंका व्यक्त केली जात होती. त्यावर रामदास कदमांनी खुलासा केला आहे, ते म्हणाले, ''मी दिवंगत बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) शपथ घेऊन सांगतो, मी आजपर्यंत कधीही किरीट सोमय्यांना भेटलो नाही. त्यांना कोणतीही कागदपत्रे दिली नाही. त्यांचं तोडंही गेल्या दोन वर्षांत पाहिलं नाही, असे रामदास कदम यांनी सांगितले. तसेच. पक्षाची हानी होईल असे मी काहीही काम केले नाही. असेही त्यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.