Rohit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Rohit Pawar : ''... तेव्हा मात्र बिळात लपून बसता'' ; रोहित पवारांचा महायुतीवर हल्लाबोल!

Pradeep Pendhare

Maharashtra Politics : जगातील सर्वात मोठे कार्यालय असलेल्या सूरत डायमंड बोर्सचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या डायमंड बोर्सच्या उद्घाटनावर राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी टिप्पणी करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

आमदार रोहित पवार(Rohit Pawar) म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सूरतमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या डायमंड बोर्सचे उद्घाटन झाले. याबद्दल गुजरात सरकारचे अभिनंदन करावे की मुंबईतला हिरे व्यवसाय आपल्या डोळ्यादेखत पळवला गेला याचे दुःख व्यक्त करावे हे समजेनासे झाले आहे.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच, ''मुंबईतला हिरे व्यवसाय संपवून सूरतच्या हिरे व्यवसायाला ताकद दिली जात असताना, आपले सत्ताधारी आपल्या खुर्च्या टिकवण्यासाठी केवळ बघ्याची भूमिका घेत राहिले. खुर्चीचा विषय असला तर दिल्लीला पन्नास चकरा मारता, दिल्लीचे पाय धरता आणि महाराष्ट्राच्या हिताचा विषय असतो तेव्हा मात्र बिळात लपून बसता, हाच का तुमचा मराठी बाणा आणि हाच का तुमचा स्वाभिमान?", असा सवाल आमदार रोहित पवार यांनी विचारला.

आमदार रोहित पवार यांनी महायुतीतील तिन्ही पक्षावर या मुद्यावरून जोरदार हल्लाबोल केला. ''भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी(अजित पवार गट) यांना केवळ सत्ता महत्त्वाची आहे का? महाराष्ट्राच्या अस्मितेची तुमच्या लेखी काही किंमत नाही का? अजून काय काय गहाण टाकणार? किमान महाराष्ट्रासाठी थोडा तरी स्वाभिमान दाखवा.'', असे त्यांनी म्हटले.

''काही वर्षांत सूरत हे नवी व्यापारी पेठ म्हणून उदयाला येत आहे. त्यामुळे येथे आता सराफा बाजार केंद्र निर्माण करण्याच्या उद्देशाने सूरत डायमंड बोर्स तयार करण्यात आले आहे. यामुळे देशाला जागतिक स्तरावर हिरे व्यापार करण्यास संधी मिळेल.''

तसेच ''आधुनिक कनेक्टिव्हिटी असणारा सूरत देशाचे एकमेव शहर असून, त्याचा जास्त लाभ उठवावा. सूरतची प्रगती झाली तर गुजरातची प्रगती होईल आणि गुजरातची प्रगती झाली तर माझ्या देशाची प्रगती होईल.'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) यावेळी सांगितले.

(Edited by Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT