Sadabhau Khot
Sadabhau Khot Sarkarnama
महाराष्ट्र

"कुठे आहे महागाई? आणि असली तरी मी समर्थन करतो" : सदाभाऊ खोत

सरकारनामा ब्युरो

चाळीसगाव : देशात पेट्रोल-डिझेल, LPG गॅस सिलेंडर या इंधनाच्या किंमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्याचा परिणाम इतर गोष्टींवर होत असून त्यामुळे जेवण, भाजीपाला या गोष्टी देखील महागल्या आहेत. नुकतीच सिलेंडच्या दरात वाढ झाली असून १ मे रोजी व्यावसायिक वापराच्या १९ किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल १०२.५० रुपयांची वाढ झाली असून हा सिलेंडर आता २ हजार ३५५.५० रुपयांना मिळत आहे. तर घरगुती एलपीजी गॅसच्या १४.२ किलोच्या एका सिलेंडरसाठी सर्वसामान्यांना १०२० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

याच गोष्टीवरुन केंद्र सरकारवर टीकेचे धनी होत असतानाच माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मात्र या महागाईचे समर्थन केले आहे. चाळीसगाव इथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, इतर कोणताही पक्ष महागाईचे समर्थन करण्याचं धाडस करणार नाही. पण मी ते धाडस करतो. कुठे आहे महागाई, मला हे सांगा. आता महागाई म्हणतं असाल तर सोनं २० हजार रुपये तोळ्यावरून ५० हजारांवर गेले. पण लोक खरेदी करतायतच. महागाई वाढली म्हणून लोकांनी दारू पिणं सोडलं का? उलट कांदा, डाळीच्या किंमती वाढल्या तर शेतकरी सुखी होईल, महागाईचा फायदा शेतकऱ्यांना होईल.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर :

गॅस सिलेंडर दरवाढीने एका आठवड्यात दोनवेळा दणका दिला असतानाच पेट्रोल-डिझेलच्या किंमती मात्र मागील महिनाभरापासून स्थिर आहेत. इंधनाच्या दरात शेवटची वाढ ६ एप्रिल रोजी झाली होती. त्यापूर्वी साडेचार महिने स्थिर असलेल्या पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) दरवाढीला २२ मार्चपासून सुरुवात झाली होती आणि सहा एप्रिलपर्यंत दरात लिटरमागे दहा रुपयांपेक्षाही अधिक वाढ झाली होती.

मात्र त्यानंतर आतापर्यंत पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागल्याचे पहायला मिळत आहे. आज जाहीर झालेल्या पेट्रोल, डिझेलच्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०५.४१ रुपये तर डिझेल ९६.६७ रुपये लिटर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर १२०.५१ तर डिझेल १०४.७७ रुपये लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव अनुक्रमे ११०.८५ व १००.९४ रुपये आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT