Devendra Fadanvis, Eknath shinde, Ajit Pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Sakal Survey 2024 : महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला सर्वाधिक लाभ; बदललेल्या समीकरणांचा झाला फायदा

Sachin Waghmare

Sakal Election 2024 Survey News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आगामी काळात होता असलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती बॅकफुटवर आली आहे. दुसरीकडे या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच सकाळ आणि साम टिव्हीच्या माध्यमातून 'कल महाराष्ट्राचा' या 288 मतदारसंघाचा सर्व्हे करण्यात आला. राज्याचा मुख्यमंत्री कोण हवा, विधानसभेवर महायुती झेंडा फडकवणार का, की महायुतीचीच सत्ता राहणार, मतदारांची कुठल्या राजकीय पक्षाला पसंती आहे, या व अशा अनेक प्रश्नांचा आढावा या सर्व्हेमध्ये घेण्यात आला. राज्याच्या 288 मतदारसंघातल्या 84 हजार 529 मतदारांनी या सर्व्हेमध्ये भाग घेतला होता. (Sakal Survey 2024 News)

2022 मध्ये राज्यांमध्ये राजकीय भूकंप झाला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट शिवसेनेलाच खंडार पाडत भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आणि ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये भाजप सत्तेत आली. त्यानंतर झालेल्या अजित पवारांच्या राजकीय बंडाळीने पुन्हा एकदा राज्यांमध्ये राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडत महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये सत्तेत सर्व पक्षांना सत्ता चाखण्याची संधी मिळाली. कोणताच पक्ष सत्तेपासून दूर राहू शकला नाही. राज्यामध्ये घडलेल्या या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर दैनिक सकाळकडून सर्वे करण्यात आला. यामध्ये बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक लाभ झाला याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व्हेमध्ये महायुतीमध्ये सर्वधिक लाभ कोणत्या पक्षाचा झाला असा प्रश्न विचारण्यात आला होता.

महायुतीमध्ये भाजप (Bjp) राज्यातील सर्वात मोठा पक्ष असूनही सत्तेपासून दूर राहावं लागलं होतं. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडांनंतर भाजपला अडीच वर्षांपूर्वी सत्तेची संधी मिळाली. यानंतर अजित पवार सुद्धा वर्षभरापूर्वी महायुतीमध्ये सामील झाले. त्यामुळे या समीकरणांमध्ये कोणाला लाभ मिळाला याबाबत विचारण्यात आले असता जनतेने सर्वाधिक लाभ हा शिंदेंच्या शिवसेनेचा झाल्याचे सांगितले.

महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फायदा झाल्याचे 37.2 टक्के लोकांना वाटते. 8.60 टक्के लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला लाभ झाल्याचे वाटते. 22.9 टक्के लोकांना भाजपला लाभ झाल्याचे सांगितले. तर सर्व पक्षांना समान फायदा झाल्याचे 31.2 टक्के लोकांनी सांगितले. त्यामुळे महायुतीमध्ये बदललेल्या समीकरणांमध्ये एकनाथ शिंदे हे फायद्यात असल्याचे दिसून आले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार निवडून आल्याने जवळपास भाजपच्या बरोबरीने खासदार निवडून आणले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशामुळे एकनाथ शिंदे यांना चांगलेच राजकीय बळ मिळाले. त्यांचे सात खासदार एनडीए सरकारच्या स्थापनेमध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण ठरले आहेत. भाजपचे राज्यात नऊ खासदार तर अजित पवार गटाचा एक खासदार निवडून आला. त्यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये महायुतीचा लाभ हा शिंदेंना झाल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT