Sanjay Raut latest news : उबाठा पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे प्रकाशन उद्या शनिवारी मुंबईत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या पुस्तकात संजय राऊत यांनी अनेक खळबळजनक दावे केले असल्याने प्रकाशनापूर्वीच या पुस्तकाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या मदतीबद्दलचा खुलासा या पुस्तकातून केला आहे. शरद पवार हे यूपीए सरकार मध्ये असताना त्यांनी नरेंद्र मोदींची अटक कशी टाळली होती याबद्दल संजय राऊत यांनी या पुस्तकात सांगितलं आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोनमुळे अमित शाह यांच्या राजकीय प्रवासातील अडचणी कशा दूर झाल्या हेही संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये संघर्ष सुरू होता. नरेंद्र मोदी हे गुजरात दंगलीप्रकरणी एक आरोपी होते. तसंच अमित शाह हे एका खूनप्रकरणी आरोपी होते, त्यावेळेस युपीएचं सरकार होतं. कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदींकडे होता. मोदींना दंगलीप्रकरणी अटक करण्यापर्यंतची परिस्थिती होती. मात्र लोकशाहीने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला अटक करणं योग्य नसल्याचं मत एका कॅबिनेटमध्ये शरद पवारांनी मांडलं होतं, त्यांच्या या भूमिकेला काही सहकाऱ्यांनी मूकसंमती दर्शवली आणि त्यामुळे मोदींची त्यावेळी होणारी अटक टळली, असा खळबळजनक गौप्यस्फोट राऊतांनी या पुस्तकात केला आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले, अमित शहा देखील खून प्रकरणात आरोपी होते. त्यांना तडीपार केलं गेलं होतं. अमित शाह यांना जामीन देण्यास सीबीआयचे पथक तयार नव्हते. मात्र त्या पथकात महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते. त्यांच्याशी संपर्क साधून पवारांनी मदत केली होती, असाही दावा राऊतांनी पुस्तकात केला. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी पुढे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचं किती स्मरण ठेवलं, असा सवाल राऊतांनी आपल्या पुस्तकात केला आहे.
गुजरातमधून अमित शाह तडीपार होते, सीबीआयने फास आवळता आणल्यामुळे शाहांच्या तात्पुरत्या जामीनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. तेव्हा बाळासाहेब मदत करू शकतात असं शाहांना कुणीतरी सुचवलं होतं.
एकेदिवशी भर दुपारी अमित शाह त्यांचा मुलगा जयला घेऊन मुंबई विमानतळावर उतरले. विमानतळावरून काळी-पिवळी टॅक्सी घेऊन ते वांद्र्याच्या दिशेला निघाले होते. मातोश्रीच्या गेटवर अमित शाह यांना चालकाने सोडलं, तिथे त्यांना आडवलं होतं. गुजरातचा आमदार आणि माजी मंत्री आहे, बाळासाहेबांना तात्काळ भेटायचं आहे, असे त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरेंनी अमित शाह यांचे म्हणणे ऐकलं. त्यानंतर मनोहर जोशी यांच्या फोनवर एका महत्त्वाच्या व्यक्तीला फोन केला, त्यामुळे अमित शाह यांना जामीन मिळाला. पण अमित शाह पुढे कसे वागले ते सर्वांनी पाहिले. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबासोबत कसे निर्घुणपणे वागले, असे राऊतांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.