Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या नेतेमंडळींसह अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांचा हा दौरा चांगलाच चर्चेत आहे. शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून टीकेची झोड उठवली आहे. याचदरम्यान, ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन जोरदार हल्लाबोल केला आहे.
राऊत म्हणाले, धर्माच्या नावावर जे चालले आहे, आम्ही त्याच्या विरोधात नाही आहोत. आम्हीही अनेकवेळा अयोध्येला गेलो आहे. पण, भाजपाचे लोक कधी आमच्याबरोबर अयोध्येला आले नाही. बाबरी मशिद पडली तेव्हा भाजपावाले आम्हाला सोडून पळून गेले होते. आता गद्दारांचे बोट धरून अयोध्येला गेले आहेत असा हल्लाबोल संजय राऊतांनी(Sanjay Raut) केला आहे.
तसेच अयोध्येत जाणं हा एक आनंद असतो. पण रामाचं जे सत्य वचन आहे ते तुम्ही कोठून घेणार? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. तुम्हाला रामाची आठवण आता झाली. जेव्हा तुम्ही पक्ष सोडला तेव्हा तुम्ही सुरत आणि गुवाहाटीला गेलात. तेव्हा तुम्हाला रामाची आठवण झाली नाही का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तेव्हा जर तुम्ही अयोध्येला गेले असते तर प्रभु श्रीरामानं असत्याच्या बाजूनं कौल दिला नसता असे राऊत म्हणाले.
शिंदेंच्या डोक्यातील बेईमानीचा कीडा जुना...
संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. राऊत म्हणाले,बेईमानी आणि गद्दारीची बीजे गेल्या साडेतीन वर्षापासून रूजवली जात होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही बंडाचे प्रयत्न सुरू होते. तेव्हा हे लोक अहमद पटेल यांना भेटून पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. अहमद पटेल यांच्याशी बैठकाही झाल्या होत्या. यांच्या डोक्यातील बेईमानीचा किडा हा जुना आहे असल्याचा हल्लाबोलही राऊतांनी केला आहे.
...म्हणून गौतम अदानी विरोधकांचे टार्गेट!
राऊतांनी यावेळी अदानी प्रकरणावर भाष्य करताना भाजपवर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, या देशातील प्रमुख उद्योगपती आणि काही राजकीय नेत्यांना टार्गेट केले जाते. मुद्दाम अदानी यांना मोकळं सोडलं जाते. लोकांच्या मनात हा संभ्रम आहे. जो न्याय गौतम अदानी यांना दिला जातो तसा न्याय इतर उद्योगपतींना द्या. गौतम अदानी टार्गेट आहेत कारण ते मोदी यांचे जवळचे मित्र आहेत. मोदी यांच्यामुळे त्यांची भरभराट झाली असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
तो प्रश्न पवारांनी मोदींना विचारायला हवा...
गौतम अदानी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले आहे. तुमच्याकडे काय दुधाने आंघोळ करतात का. अनेक उद्योगपती तुरुंगात आहेत. मग, तोच न्याय तोच कायदा गौतम अदानी यांच्याबाबतीत का नाही. हा प्रश्नसुद्धा शरद पवार यांनी विचारायला हवा, अशी विनंती संजय राऊत यांनी केली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.