Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political News Live : उद्धव ठाकरेंच्या नेत्याचं जात प्रमाणपत्र अवैध ?आमदारकीही धोक्यात....

Sarkarnama Headlines Live Updates : राज्य आणि महत्वाच्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी वाचा एका क्लिकवर.

सरकारनामा ब्युरो

उद्धव ठाकरेंच्या नेत्याचं जात प्रमाणपत्र अवैध ? आमदारकीही धोक्यात....

उमरगा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची विनंती करणारी याचिका बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे स्वामी यांच्या आमदारकीवरही टांगती तलवार असणार आहे.

वाल्मिक कराडच्या पत्नीची मनोज जरांगेंना घेरलं,म्हणाल्या, संतोष देशमुख माझ्या बांधवासारखाच, पण मला

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सात दिवसांची पोलिस कोठडी झालेल्या वाल्मिक कराडच्या पत्नीनं मंजिली कराड यांनी आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणे यांचीही प्रकरणं बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला. यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, संतोष देशमुख माझ्या बांधवासारखाच आहे.त्याच्यासोबत जे कूकर्म करणार्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे.पण माझ्या पतीवरही अन्याय होत आहे मी कुणाकडे न्याय मागायचा.

संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट ! न्यायालयीन चौकशी समितीची घोषणा

हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी न्यायाधीशांची चौकशी समिती नेमण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.त्यानुसार आता बीड प्रकरणी न्यायालयीन चौकशी समितीची घोषणा करण्यात आली आहे.तर निवृत्त न्यायाधीश एम.एल ताहिलाीयांनी आणि परभणी प्रकरणात व्ही.एल अचलिया यांच्या नेतृत्वाखालील न्यायालयीन चौकशी समितीची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.

Walmik Karad : परळी-अंबाजोगाई रस्त्यावर उतरले आंदोलक

वाल्मिक कराडच्या समर्थकांनी परळीतील कन्हेरवाडीत रस्त्यावर टायर पेटवले. वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ कन्हेरवाडी गावाबाहेर परळी-अंबाजोगाई रस्त्यावर टायर जाळण्यात आले. यावेळी कराड समर्थकांकडून टायर पेटवून घोषणाबाजी करण्यात आली.

Dhananjay Deshmukh : 'तपासात काय-काय कनेक्शन सापडतात ते समोर येईलच' 

न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. ती येत्या काळात सुरूच राहणार आहे. आम्ही तपासासंदर्भात अपडेट घेतली आहे. तपास योग्य दिशेने सुरू आहे. आम्हाला विश्वासात घेतले की योग्य दिशेने तपास सुरू आहे, असे धनंजय देशमुख यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. अद्याप तपास बाकी आहे. त्यामुळे त्या तपासाकडे आपले लक्ष आहे. काय-काय कनेक्शन सापडतात ते समोर येईल, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.

Narendra Modi : बैठकीप्रसंगी पीएम मोदींनी दिल्या आमदारांना अनेक टिप्स

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. त्या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यानंतर दुसऱ्यांना नरेंद्र मोदी मुंबईत आले. यावेळी त्यांनी महायुतीच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आमदारांना अनेक टिप्स दिल्या आहेत. येत्या काळात गावागावात महायुतीने डब्बा पार्टीचे आयोजन करावे, असा सल्ला त्यांनी दिला. मोदी यांच्या सल्लामुळे आता महायुतीकडून गावागावात डब्बा पार्टी होण्याची शक्यता आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात शस्त्रबंदी अन् जमावबंदी

अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियमातील तरतुदींनुसार 37(1)(3)अन्वये 22 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला. हा आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पंकजा मुंडे गृहमंत्र्यांशी चर्चा करणार

वाल्मिक कराड पोलिस कोठडी सुनावताच बीडमध्ये कराड समर्थक आक्रमक झाले आहे. रस्त्यावर टायरं जाळली जात आहेत. तर परळीत एकाने स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. शिवाय, बीड कोर्टाबाहेरही कराड समर्थक आणि विरोधक आमनेसामने आल्याने परिस्थिती चिघळली होती. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड याला कोठडी सुनावताच, न्यायालयाबाहेर समर्थक अन् विरोधकांमध्ये गोंधळ

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात मकोका लागलेला आरोपी वाल्मिक कराड याला न्यायालयाने (Court) 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर न्यायालयाबाहेर वाल्मिक कराड समर्थक आणि विरोधकांमध्ये गोंधळ झाला. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी झाली. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

Santosh Deshmukh Murder Case : मोठी बातमी! संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात  वाल्मिक कराड याला सात दिवसांची पोलिस कोठडी

बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात वर्ग करून घेतलेल्या वाल्मिक कराड याला जिल्हा व सत्र न्यायालयाने सात दिवसांची कोठडी सुनावली. अर्थात 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे. एसआयटीने वाल्मिक कराड याला न्यायालयासमोर हजर केले. वाल्मिक कराड याला मकोका लावण्यात आलेला आहे.

Santosh Deshmukh Murder Case : कोणताच पुरावा नाही, वाल्मिक कराड याच्या वकिलांचा युक्तिवाद

संतोष देशमुख हत्येच्या कटाच्या गुन्ह्यात वर्ग केलेल्या वाल्मिक कराड याची 'एसआयटी'ने बीड न्यायालयाकडे दहा दिवसांची कोठडी मागितल. त्यावर आरोपी कराडचे वकील यांनी कोणताही पुरावा नाही. अटकेत असलेल्या इतर आरोपींनी नाव घेतलेले नाही. एखाद्याला फोन कॉल केला म्हणजे, आरोपी होऊ शकतो का? खंडणी आणि खून प्रकरणात आरोपी कसे काय केले? याचे पुरावे देखील नाहीत, असा युक्तिवाद केला.

NCP Politics : बीड जिल्ह्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त

बीड मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर बीड जिल्ह्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळे आरोप होत आहेत. काही पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी चौकशी देखील केली. यामुळे अजित पवार यांनी बीड जिल्ह्याची कार्यकारणीच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Walmik Karad : वाल्मिक कराड याचा 'तो' फ्लॅट सील होणार

walmik karad 1

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात असलेल्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील वाल्मिक कराड आणि त्याची पत्नी मंजली यांचा 4BHK फ्लॅट मिळकत कर न भरण्यास सील केला जाणार आहे, मग त्याचा लिलाव ही केला जाईल, असे पिंपरी चिंचवडच्या महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड याच्या रिमांडवर थोड्याच वेळात सुनावणी सुरू होणार

बीडमधील (BEED) संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात वर्ग करून घेतलेल्या वाल्मिक कराड याला जिल्हा व सत्र न्यायालयात आज हजर केले जात आहे. जिल्हा न्यायालयात अडीच वाजता सुनावणीला सुरवात होणार आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्यासमोर सुनावणी होईल. सरकार पक्षातर्फे वकील बाळासाहेब कोल्हे, वकील अजय राख मांडू शकतात. वाल्मिक कराड याच्यातर्फे वकील सिद्धेश्वर ठोंबरे मांडतील.

Walmik Karad Update : बीड कोर्टात आणले

वाल्मिक कराडला बीड जिल्हा न्यायालयात आणण्यात आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली असून एसआयटीने कस्टडीकडून कोठडीची मागणी केली जाणार आहे. थोड्याच वेळात सुनावणीला सुरूवात होईल.

Pooja Khedkar News : अटकेपासून दिलासा

माजी परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाने अटकेपासून दिलासा दिला आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत अटक करू नये, असे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. दिल्ली हायकोर्टाने खेडकरचे अटकेपासूनचे संरक्षण नुकतेच काढून घेतले होते. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. इथे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

PM Narendra Modi in Mumbai : आमदारांसोबत बैठक सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. महायुतीच्या आमदारांसोबत त्यांची बैठक सुरू झाल्याचे समजते. या बैठकीत ते आमदारांना कोणता कानमंत्र देणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. नेव्हीच्या आंग्रे सभागृहात हा संवाद सुरू आहे.

Vinod Tawde News : शरद पवारांवर पलटवार

शरद पवारांनी अमित शहा यांच्यावर केलेली टीका विनोद तावडे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांनी पवारांवर टीका करताना म्हटले की, दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटर मध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती!

Walmik Karad Update : बीडमध्ये होणार सुनावणी

वाल्मिक कराडच्या रिमांडवर आता बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. सीआयडीने याबाबत केलेला अर्ज कोर्टाने स्वीकारला आहे. यापूर्वी केज कोर्टात ही सुनावणी होणार होती. मोक्काअंतर्गत पोलिसांकडून कोठडी मागितली जाणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीला महत्व प्राप्त झाले आहे.

Walmik Karad Update : पोलिस-वकिलांमध्ये वादावादी

वाल्मिक कराडला आज पुन्हा केज कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यासाठी कोर्टाच्या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोर्टात वकिलांनाही सोडतानाही काळजी घेतली जात आहे. त्यावरून पोलिस व वकिलांमध्ये वादावादी झाली. वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटल्याचे समजते.

PM Narendra Modi Live : विस्तारवाद आणि विकासवादाला प्राधान्य

दहशतवाद, हत्यारं आणि डॅग्ज तस्करीविरोधात भारत खंबीरपणे उभा आहे. विस्तारवाद नव्हे तर विकासवादावर भारत काम करत आहे. इंडो पॅसिफिकमध्ये सहकार्यावर भारताचा भर आहे समुद्राला सुरक्षित बनविण्यासाठी काम करत आहोत. त्यामुळे जगाचा भारतावरील विश्वास वाढला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मुंबईत मोदींच्या हस्ते आज तीन युध्दनौकांचे राष्ट्रार्पण करण्यात आले.

Walmik Karad Update : समर्थक आजही आक्रमक

वाल्मिक कराडचे समर्थक आजही आक्रमक झाले आहेत. एका समर्थकाने परळीत मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. कराड यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची मागणी या समर्थकाकडून केली जात आहे.

PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान मुंबईत दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. नौदलाच्या युध्दनौकेचे त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार असून त्यासाठी ते नौदलाच्या तळावर पोहचले आहेत. तीन अत्याधुनिक युध्दनौकेचे मोदींच्या हस्ते लोकार्पण होईल. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारही यावेळी उपस्थित आहेत.

Aaditya Thackeray Tweet :  वाहतुक कोंडीमुळे संतापले! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर असल्याने अनेक भागातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याने ठिकठिकाणी वाहतुक कोंडी झाली आहे. त्यावरून आमदार आदित्य ठाकरे चांगलेच संतापले. कामाच्या दिवशी मुंबईतील वाहतूक ब्लॉक करण्यात आली आहे. लाखो लोकांना कार्यालयात जायला उशीर होतोय. पश्चिम द्रुतगती महामार्गावर अनेकजण अडकले आहेत. व्हीआयपींचे कार्यक्रम कामाच्या दिवशीच का, आठवड्याच्या शेवटी का होत घेतले जात नाहीत, असा सवाल ठाकरेंनी केला आहे. निवडणुकीप्रमाणे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करावा, असेही ठाकरेंनी म्हटले आहे.  

Walmik Karad Live Update : वाल्मिक कराडला पुन्हा केलं जाणार केज न्यायालयात हजर

वाल्मिक कराडला मंगळवारी (ता.14) न्यायालयात हजर करण्यात आले होते. पण आता पुन्हा एकदा त्याला केज न्यायालयात हजर केले जाणार असून आज (ता.15) त्याला बीड जिल्हा कारागृहातून बाहेर काढले आहे. त्याला पोलीस बंदोबस्तात बीड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून काही वेळात केजच्या दिशेने पोलिस रवाना होतील. दरम्यान SIT कराडचा ताबा मागणार असून न्यायालय कोणता निर्णय देतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Walmik Karad Live Update : परळी बंदची हाक

वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून परळी बंदची हाक दिली आहे. याबाबत आता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Anjali Damaniya Live Update : धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी घेणार? अंजली दमानियांचा सवाल

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. यानंतर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारणी देखील बरखास्त करण्यात आली आहे. यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी घेणार? असा सवाल उपस्थित केला आहे. वाल्मिक कराडला सरकारी सुरक्षारक्षक कोणी पुरवला? सामान्य नागरिकांच्या कराच्या पैशातून अशा गुंडांना सुरक्षा पुरवणार का? कराड वर गंभीर गुन्हे दाखल असताना लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष कसा केला? असे सवाल दमानिया यांनी गृहमंत्र्यांना एक्स पोस्टमधून केले आहेत.

Ajit Pawar NCP Live Update : बीडमधील राष्ट्रवादीची कार्यकारिणी बरखास्त

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी माहिती दिली असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या सूचनेनुसार ही कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. तर येथून पुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र्य पडताळणी केली जाणार असेही संकेत त्यांनी दिले आहेत.

Mahayuti Government Live Update : महायुतीत परस्परांवर कुरघोडीला सुरुवात? राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्याच्या निर्णयाला स्थगिती

महायुतीत परस्परांवर कुरघोडी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या 2 मंत्र्याच्या निर्णयाला परस्पर स्थगिती दिल्याने आता नवा वाद सुरू झाला आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराजी व्यक्त करताना, किमान पक्ष प्रमुख म्हणून आपल्याशी त्यांनी चर्चा करायला हवी होती, असे म्हटलं आहे.

Maharashtra Ekikaran Samiti LIVE : शुक्रवारी सीमाप्रश्‍नी होणार कोल्हापुरात धरणे आंदोलन

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न गेली २० वर्षांपासून धुमसत असून सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. आता सीमाप्रश्नात थेट महाराष्ट्रानेच लक्ष घालावे यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती कोल्हापुरात धरणे आंदोलन करणार आहे. शुक्रवारी (ता. 17) जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात येईल अशी माहिती समितीचे माजी आमदार मनोहर किणेकर आणि प्रकाश मरगाळे यांनी दिली आहे.

Walmik Karad Live Update : वाल्मीक कराडच्या समर्थनाकाकडून आज परळी बंदची हाक

वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी आणि मोक्का लावण्यात आल्यानंतर परळीत वातावरण चांगलेचं तापलं आहे. येथे वाल्मीक कराड याच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तर आज (ता.15) परळी बंदची हाक देण्यात आली आहे.

Nylon Manja Live Update : पतंग आणि मांजामुळे दोन बालकांसह पाच जण जखमी, रुग्णालयात उपचार

जळगाव मकर संक्रातीच्या दिवशी पतंग उडवताना आणि मांजामुळे दोन बालकांसह पाच जण जखमी झाले. जिल्ह्यात विविध घटनेत दोन बालकं जखमी झाली असून यात एका 7 वर्षीय बालकाचा समावेश आहे. पतंग उडवताना दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने ते बालक बेशुद्ध झाले. त्याला दुखापत झाली आहे. तर दुसरे बालक 8 वर्षीय बालक पतंग पकडण्यासाठी पळत असताना खाली पडल्याने चेहऱ्याला मार लागल्याने जखमी झाले आहे. या शिवाय दुचाकीवर जाणाऱ्या महिलेसह दोन जणांच्या गळ्याला व हाताच्या बोटाला मांजा कापल्याने गंभीर दुखापत झाली आहे. सध्या यासर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nylon Manja Live Update : देशात नायलॉन मांजामुळे 7 जणांचे बळी

नायलॉन मांजाचा फास अनेकांच्या गळ्याला घट्ट बसत आहे. पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजाचा अतिउत्साह 7 जणांच्या जीवावर उठला आहे. नायलॉन मांजामुळे राज्यात तीन, तर देशात एकूण सात जणांचा बळी गेला आहे. नाशिक, नंदुरबार, अकोल्यात प्रत्येकी एकाचा बळी गेला असून 10 जण जखमी झाले आहेत. तर गुजरातमध्ये नायलॉन मांजामुळे चार जणांचा जीव गमवावा लागला असून मुंबईत 19 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Asaram Bapu live Update : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूला 31 मार्चपर्यंत जामीन मंजूर

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू याला मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव 31 मार्चपर्यंत सशर्त हंगामी जामीन मंजूर केला. दरम्यान 8 दिवसांपूर्वी वैद्यकीय कारणासाठी आसारामला 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. या कालावधीत देखरेखीसाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

 Walmik Karad News : वाल्मिक कराडला आज केज कोर्टात हजर करणार

वाल्मिक कराडवर मंगळवारी (ता.15) 'मकोका'अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला आज केज कोर्टात करणार हजर केलं जाणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा कट रचल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर कराडला मकोका लावताच परळीतील वातावरण तापलं असून कराड समर्थक आक्रमक झाले आहेत.

PM Modi Mumbai Visit : PM मोदी घेणार महायुतीच्या आमदारांची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी नौदलाच्या सोहळ्यानंतर मुंबईतील आंग्रे सभागृहात ते महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेना आमदारांची बैठक पार पडली.

PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान मोदी नौदलाच्या कार्यक्रमासाठी मुंबईत येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज मुंबईत नौदलाच्या दोन युद्धनौका आणि एक पाणबुडी ताफ्यात सामील होणार आहे. पंतप्रधान मोदी नौदलाच्या कार्यक्रमानंतर नवी मुंबईत खारघर इथे उभारलेल्या इस्कॉन मंदिराचं उदघाटन करणार आहेत. सकाळी पावणे दहाच्या सुमाराला पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल होतील. नौदलाचा प्रस्तावित कार्यक्रम सकाळी साडेदहा वाजता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT