Satej Patil-Shinde
Satej Patil-Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

सतेज पाटलांनी गडहिंग्लज गाठले... पण श्रीपतराव शिंदेंनी शब्द नाही दिला!

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार तथा पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी गडहिंग्‍लज येथे जनता दलाचे नेते श्रीपतराव शिंदे (Shripatrao Shinde) यांची आज भेट घेतली.

गडहिंग्‍लज नगरपालिकेवर जनता दलाची सत्ता आहे. नगरपालिकेत एकूण २२ नगरसेवक आहेत. यापैकी १५ नगरसेवक हे श्री.शिंदे गटाचे आहेत. उर्वरीत ६ राष्‍ट्रवादी तर १ शिवसेनाचा नगरसेवक आहे. त्यामुळे श्री.शिंदे गटाला इतर निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीतही महत्‍व प्राप्‍त झाले आहे. सध्या तरी शिंदे यांनी थांबा आणि पहाची भूमिका घेतली आहे.

गतवेळच्या निवडणुकीप्रमाणेच यावेळची विधानपरिषद निवडणूकही अटीतटीच्या होण्याच्या मार्गावर आहे. ही लढत पारंपरिक प्रतिस्‍पर्ध्यांमध्ये म्‍हणजेच सतेज पाटील विरुध्‍द महाडिक अशी होत आहे. पालकमंत्री पाटील यांच्या विरोधात नेमके लढणार कोण हे मात्र अजुन निश्‍चित झालेले नाही.

जिल्‍हा परिषद माजी अध्यक्षा शौमिका महाडिक किंवा माजी आमदार अमल महाडिक या दोघांपैकी एकाच्या गळ्यात भाजपची उमेदवारी पडण्याची चिन्‍हे आहेत. जरी उमेदवारीची घोषणा झाली नसली तर महाडिक यांनी नेटाने प्रचार सुरु ठेवला आहे. पालकमंत्री पाटील यांची उमेदवारी यापूर्वीच निश्‍चित असल्याने गेल्या काही महिन्यांपासून ते या निवडणुकीची जोडणी करत आहेत. सध्या पालकमंत्री पाटील व महाडिक कुटुंबियांचे सदस्य प्रचारासाठी जिल्‍हाभर फिरत आहेत. आज सकाळीच पालकमंत्री सतेज पाटील यांनी गडहिंग्‍लज येथे जनता दलाचे ज्‍येष्‍ठ नेते श्रीपतराव शिंदे यांची भेट घेतली.

गडहिंग्‍लज तालुक्यात विधान परिषदेसाठी २८ मतदान आहे. यातील २२ मतदान हे गडहिंग्‍लज नगरपालिकेचे आहे. नगरपालिकेवर शिंदे गटाची एकहाती सत्ता आहे. २२ पैकी १५ नगरसेवक हे शिंदे गटाचे आहेत. पालकमंत्री पाटील यांच्या भेटीवेळी शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे सर्व नगरसेवक उपस्‍थित होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत राहण्याचे पालकमंत्री पाटील यांनी शिंदे यांना आवाहन केले. मात्र अजुनतरी शिंदे यांनी पाठिंब्याची घोषणा केलेली नाही. पुढील काही दिवसात शिंदे यांची भूमिका स्‍पष्‍ट होणार आहे.

तालुक्यात नगरपालिके व्यतिरिक्‍त जिल्‍हा परिषदेचे ५ सदस्य तर पंचायत समितीच्या एका सभापतीचे मतदान असणार आहे. यातील २ जिल्‍हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर व प्रा.अनिता चौगले या भाजपच्या आहेत. राणी खेमलटटी व रेखा हत्तरगी या महिला सदस्या महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीच्या आहेत. तर सतीश पाटील व पंचायत समिती सभापती हे राष्‍ट्रवादीचे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT