Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले. महायुतीला कमी जागा मिळाल्या त्यामुळे राज्यातील वातावरण अजूनही तापलेले आहेच. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असतानाच राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
तर दुसरीकडे मंत्री पाटील यांनी कौतुक केल्यानंतर काँग्रेस नेते व माजी मंत्री सतेज पाटील यांनी चांगलेच फटकारले. महाविकास आघाडीत (MVA) सर्व काही सुरळीत सुरु असून चंद्रकांत पाटलांनी वाद लावू नयेत, असा सल्ला दिला.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मेहनत घेतल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सर्वाधिक झाल्याने त्याचं आत्मपरीक्षणही उद्धव ठाकरे यांनी करावं, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. पाटील यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मेहनत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यांची ही मेहनत पाहून एक मित्र या नात्याने मनात भीती वाटत होती. आजारपण असतानाही त्यांनी मेहनत घेतली. संपूर्ण राज्यभर खूप फिरले. पण ठाकरे गटाचे केवळ 9 खासदार निवडून आले. त्या तुलनेत काँग्रेसला (Congress) 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 8 जागा मिळाल्या आहेत, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेची युती सत्तेत आली असती तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला घरीच बसायचे होते. आज निवडून आलेल्या 13 आणि 8 जागा आल्या नसत्या. दुसऱ्या बाजूने उद्धव ठाकरे यांच्या जागा 18 वरून 9 वर आल्या.
2019ला सोबत राहिले असते तर वाताहत झाली नसती. या सर्वात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बक्कळ फायदा करून घेतला. राष्ट्रवादी व काँग्रेसचे मते ठाकरे गटाला मिळाले नाहीत तर ठाकरे गटाचे मात्र या दोन्ही पक्षाला मते मिळाली, असेही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) म्हणाले.
या चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलेल्या मतावर काँग्रेस नेते व माजी मंत्री सतेज पाटील यांनी सडकून टीका केली. चंद्रकांत पाटील यांनी भाजप व महायुतीची काळजी करावी. त्यांनी महाविकास आघाडीत लुडबुड करू नये. महाविकास आघाडीतील घटक पक्षात सर्व काही सुरळीत सुरु असून त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी आमच्यात वाद लावू नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला.