Memories of N.D. Patil sir
Memories of N.D. Patil sir Sarkarnama
महाराष्ट्र

वय ८०, पण एन.डी. पाटील मंत्रालयात लिफ्टच्या रांगेत उभे असायचे...

ऋषीकेश नळगुणे

मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील (N. D. Patil) यांनी सोमवारी ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने समाजातील शोषित आणि वंचित घटकाचा आधार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. एन. डी. पाटील यांनी आजवर अनेक लढ्यांचे नेतृत्व केलं असून महाराष्ट्राचा एक पुरोगामी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. आयुष्यभर शेतकरी आणि कष्टकरी लोकांशी बांधिलकी मानुन काम करणारा हा लढवय्या लोकनेता होता.

डॉ. एन. डी. पाटील यांना महाराष्ट्र जेवढा शोषित आणि वंचित घटकाचा आधार, जेष्ठ नेता म्हणून ओळखतो तेवढाच त्यांच्या साधेपणासाठी देखील त्यांना ओळखतो. एन. डी. पाटील यांच्या याच साधेपणाचा अनुभव २००७-०८ साली लातुरचे सध्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांना आला होता. याबाबतचा अनुभव त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितला आहे. युवराज पाटील हे त्यावेळी मंत्रालयात सहायक संचालक (डी. एल. ओ) या पदावर कार्यरत होते.

आपला अनुभव सांगताना युवराज पाटील सांगतात, मंत्रालयात नेहमीची वर्दळ होती, मी अचानक काम निघालं म्हणून चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टच्या रांगेत उभा होतो. त्या दिवशी कॅबिनेटची बैठक होती त्यामुळे गर्दी होती. माझ्या मागे पण रांग वाढली. लिफ्टवाले काका पळत आले, मी मागे वळून पाहिले तर माझ्यामागे डॉ. एन. डी. पाटील थांबले होते. त्यांच्या एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात फाईल होती. लिफ्टवाले काका म्हणाले, चला, लिफ्टमध्ये. खरंतर प्रोटोकॉलप्रमाणे माजी मंत्री, आमदार, खासदार यांना लिफ्टमध्ये जागा द्यावी लागते पण, एन डी पाटील म्हणाले, हे लोकंही माझ्या एवढ्याच महत्वाच्या कामाला आले आहेत, दोन मिनिटात संपेल रांग, तू तुझे काम बघ.

एन. डी. पाटील यांच्या या सहज कृतीने मी आवाक झालो. त्यानंतर अनेक वेळा त्यांना अगदी सहजपणे, कोणताही अविर्भाव न बाळगता, हातात फाईल घेवून मंत्रालयात एकट्याने फिरताना पाहिले. तेव्हा पासून हा माणूस म्हणजे वेगळं रसायन आहे, याची खात्री पटली. पुढे अनेक प्रसंग बघितले, त्या प्रत्येक प्रसंगागणिक ही व्यक्ति मला मोठी वाटत गेली..आज ते गेले ऐकून हा सगळा पट डोळ्यासमोर आला. एन डी सर... भावपूर्ण श्रद्धांजली....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT