Sharad Pawar statement on joining NDA: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची NDAसोबत वाढती जवळीक असल्याच्या चर्चांना आता खुद्द शरद पवारांनीच पूर्णविराम दिल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोनदा भेट घेतली.
त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आठ खासदारांनी मोदींची भेट घेतली, तर सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे शरद पवारांचा पक्ष NDAसोबत जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. पक्ष NDAसोबत जाणार का, असा सवाल काही जिल्हाध्यक्षांकडून उपस्थित करण्यात आल्याची माहिती आहे. त्यावर शरद पवार यांनी ‘आपण विरोधातच आहोत, कोणीही संभ्रमात राहू नये. जोमाने काम करा,’ असा स्पष्ट संदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुप्रिया सुळेंनीही दिला ‘सरकारविरोधी लढ्याचा’ संदेश
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनाचा संदर्भ देत पदाधिकाऱ्यांचे लक्ष सरकारविरोधातील आपल्या भूमिकेकडे वेधले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आपण संसदेत ज्या पद्धतीने लढत आहोत, त्याच पद्धतीने रस्त्यावरचीही लढाई लढायची आहे, असे त्यांनी सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे पक्षाच्या सरकारविरोधातील भूमिकेबाबत कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये, असा संदेश बैठकीतून देण्यात आला.
सुप्रिया सुळे यांनी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचेही सांगितले. ‘लोकांच्या प्रश्नांवर ताकदीने लढा, जिल्ह्यातील रिक्त पदे तातडीने भरा आणि कामाला लागा,’ असे निर्देश त्यांनी जिल्हाध्यक्षांना दिल्याची माहिती आहे. शनिवार आणि रविवारी झालेल्या बैठकीत सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी विविध जिल्ह्यांतील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेतला.
NDAसोबत जाण्याच्या चर्चांना शरद पवारांचा ब्रेक?
शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटी, तसेच राष्ट्रवादीच्या खासदारांच्या केंद्रातील सत्ताधारी नेत्यांशी झालेल्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात होते. मात्र, जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत शरद पवारांनी दिलेल्या स्पष्ट संदेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष NDAसोबत जाणार असल्याच्या चर्चांना तूर्तास ब्रेक लागल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये निर्माण झालेला संभ्रमही या भूमिकेमुळे दूर होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.