Mumbai News: राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना अद्याप अडीच वर्षांचा कालावधी बाकी आहे. मात्र,भाजप काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचदरम्यान,महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून महत्वाची अपडेट समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शनिवारी (ता.29) प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. शरद पवारांच्या पक्षानं एकूण 10 प्रवक्त्यांची नियुक्ती केली आहे. या प्रवक्त्यांमध्ये नव्या-जुन्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती.या बैठकीला पक्षाचे महत्त्वाचे नेते हजर होते. यात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे, शिरुरचे खासदार डॉ अमोल कोल्हे, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, माजी खासदार फौजिया खान, राजेंद्र शिंगणे, माजी आमदार अशोकबापू पवार हे नेतेमंडळी उपस्थित होते.
या बैठकीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या प्रवक्त्यांच्या यादीत माजी मंत्री व फायरब्रँड नेते जितेंद्र आव्हाड,, क्लाईड क्रास्टो,भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे, फैजल मिर्झा, महेबूब शेख,प्रवीण कुंटे,प्रशांत सोनबा वीरकर, अॅड. हेमाताई पिंपळे, डॉ.चंद्रकांत बारेला यांचा समावेश आहे.
शरद पवारांच्या पक्षाकडून नव्यानं नियुक्त करण्यात आलेल्या या सर्व प्रवक्त्यांवर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी असणार आहे. आजच्या बैठकीची माहिती आणि फोटो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहिले. यावेळी पक्ष संघटना आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहितीही सुळे यांनी पोस्टमध्ये दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाने 4 ऑगस्ट 2026 ला आपल्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या बरखास्त केल्या होत्या. पक्षाने मागील सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने रद्द केल्या होत्या आणि केवळ विद्या चव्हाण व महेश तपासे यांच्याकडे प्रसारमाध्यमांची जबाबदारी दिली होती. पक्षहित आणि संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी या निर्णयाची गांभीर्याने नोंद घ्यावी", असं आवाहनही त्यावेळी शशिकांत शिंदे यांनी केलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाने ऑगस्ट 2026 मध्ये आपल्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करून संपूर्ण पॅनेल बरखास्त केले होते. बरखास्त करण्यात आलेल्या प्रवक्त्यांच्या यादीतून माजी प्रवक्ते विकास लवांडे यांना वगळण्यात आलं होतं. जुन्या प्रवक्त्यांची यादीतून डच्चू मिळाल्यानंतर आता नव्याने जाहीर करण्यात आलेल्या यादीतही त्यांना प्रवक्तेपद नाकारण्यात आलं आहे. पक्षाचा हा निर्णय आपल्यासाठी आदेशासारखा असून आपण तो स्वीकारत असल्याचं लवांडे यांनी त्यांच्या 'एक्स' (X) पोस्टद्वारे त्याचवेळी स्पष्ट केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रवक्ते विकास लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी 20 नावे जाहीर करत संबंधित नावे वारकरी संप्रदायातील कथित घुसखोर असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपांमुळे हिंदुत्ववादी आणि वारकरी संघटना आक्रमक झाल्यामुळे नवा वाद पेटला होता. त्यानंतर लवांडेंवर शाईफेकही करण्यात आली होती. प्रवक्तेपदावरुन वगळण्यात आल्यानंतर लवांडे यांना त्याच वादाचा फटका बसल्याची जोरदार चर्चा जोर धरू लागली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.