Maharashtra NCP Politics : शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना दहा तारखेला एकत्र बसू असे सांगतानाचा व्हिडीओ समोर येताच, खासदार सुनील तटकरे यांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रियेवरून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीमध्ये विलीनीकरणाचा मुद्दा तापला आहे.
याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार आणि अजितदादांच्या बैठकीचा जुना व्हिडीओ समोर आणत, तटकरे आणि पटेल यांच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे सोशल मीडिया फ्रंटचे प्रदेश संघटक संदीप उदमले यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दोन्ही राष्ट्रवादींच्या (NCP) विलीनीकरणाची इत्यंभूत माहिती अजित पवार यांनी आपल्याला दिली होती. एवढेच नव्हे, तर अजित पवार आज हयात असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसल्या असत्या, अशी भूमिका अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मांडली आहे. विलीनीकरणावर यापूर्वी आपल्याला काहीच माहिती नाही, अशी भूमिका तटकरेंनी घेतली आहे. आता त्यांची बदलेली भूमिका म्हणजे, राजकीय यू-टर्न आहे, असे पाहिले जाऊ लागले आहे.
सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या या भूमिकेवर शरद पवार राष्ट्रवादीकडून कोणाचा दबाव होता, याचे स्पष्टीकरण मागितले जाऊ लागले आहे. यातच शरद पवार राष्ट्रवादीचे सोशल मीडिया फ्रंटचे प्रदेश संघटक संदीप उदमले यांनी शरद पवार यांच्याबरोबर अजित पवार यांच्या बैठकीचा व्हिडिओ शेअर करत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना, संदीप उदमले यांनी, खासदार सुनिल तटकरे व खासदार प्रफुल्ल पटेल हे दोघंही अत्यंत धूर्त आहेत, अशी टीका करताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष एकत्रित येण्याबाबत कोणतीही सकारात्मक चर्चा झालेलीच नव्हती, या तटकरेंच्या विधानाची उपहासात्मक खिल्ली उडवताना, शरद पवार यांच्याबरोबर अजित पवार यांच्या बैठकीचा व्हिडीओ शेअर करत व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे! असे म्हटले आहे.
या व्हिडीओमध्ये शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, अमोल कोल्हे, रोहित पवार दिसत आहेत. जेव्हा ही बैठक झाली तेव्हा हे दोघंही (सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल) दिल्ली दरबारी सत्तेसाठी पायघड्या घालत होते, असा टोलाही संदीप उदमले यांनी लगावला आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भात अनेक बैठका झाल्या आहेत. या बैठकासंदर्भात पूर्वी सुनील तटकरे यांनी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगत होते. आता त्यांच्या भूमिका बदलली आहे. त्यामुळे त्यावेळी त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का? असा प्रश्न शरद पवार राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.