Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सध्या संघटनात्मक बदलाचे वारे वाहू लागले आहेत. रोहिणी खडसे यांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. खडसेंनंतर महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कुणाच्या हाती द्यायची यावरुन आता पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडून महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी विदर्भाला संधी देण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नागपूर विभागातील डॉ. अंजली साळवे यांच्याकडे महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काही दिवसांपूर्वीच 15 नव्या अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आता महिला विंगमध्येही पवार हे भाकरी फिरवणार असल्याचं बोललं जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष पद विदर्भाकडे दिले जाण्याची शक्यता आहे. खान्देशमधून रोहिणी खडसे यांना महिला प्रदेशाध्यक्षपदी संधी दिली गेल्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यांच्या जागी नवीन महिला प्रदेशाध्यक्षपदी नागपूर विभागातील डॉ.अंजली साळवे यांचे नाव अध्यक्षपदासाठी सर्वात आघाडीवर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हस्ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अंजली साळवे यांना महिला प्रदेशाध्यक्षपदाचं नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र,आता प्रदेशाध्यक्षपदानंतर रोहिणी खडसे यांच्याकडे पक्ष कोणती नवी जबाबदारी देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
अंजली साळवे यांची ओळख ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून आहे. आंदोलनं, मोर्चे, पत्रकार परिषदा यांसह विविध ठिकाणी त्या पक्षाची रोखठोक भूमिका मांडताना त्या दिसून येतात. महिलांच्या समस्या, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी यापूर्वी साळवे या राज्य महिला आयोगावरील अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नियुक्तीवरून केलेल्या टीकेनंतर चर्चेत आल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाने ऑगस्ट 2026 मध्ये आपल्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करून संपूर्ण पॅनेल बरखास्त केले होते. बरखास्त करण्यात आलेल्या प्रवक्त्यांच्या यादीतून माजी प्रवक्ते विकास लवांडे यांना वगळण्यात आलं होतं. जुन्या प्रवक्त्यांची यादीतून डच्चू मिळाल्यानंतर आता नव्याने जाहीर करण्यात आलेल्या यादीतही त्यांना प्रवक्तेपद नाकारण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शनिवारी (ता.29 ऑगस्ट) प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. शरद पवारांच्या पक्षानं एकूण 10 प्रवक्त्यांची नियुक्ती केली आहे. या प्रवक्त्यांमध्ये नव्या-जुन्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. या प्रवक्त्यांच्या यादीत माजी मंत्री व फायरब्रँड नेते जितेंद्र आव्हाड, क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे, फैजल मिर्झा, महेबूब शेख, प्रवीण कुंटे, प्रशांत सोनबा वीरकर, अॅड. हेमाताई पिंपळे, डॉ.चंद्रकांत बारेला यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.