shilpa Bodkhe, Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Shilpa Bodkhe : निवडणूक जाहीर होताच एकनाथ शिंदेंना धक्का; फायरब्रँड महिला नेत्याचा शिवसेनेला रामराम

Rajanand More

Mumbai News : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसला आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या व पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख प्रा. शिल्पा बोडखे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे त्यांनी राजीनामा देताना हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत महायुतीतील इतर पक्षांतील नेत्यांवर आगपाखड केली आहे.

शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या म्हणून बोडखे यांनी ओळख होती. आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्ष सोडल्याने शिंदेंसाठी मोठा झटका मानला जात आहे. शिल्पा बोडखे यांनी सोशल मीडियात एकनाथ शिंदे यांना लिहिलेले राजीनामापत्र पोस्ट केले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, आपल्या सोबत असलेल्या पक्षातील काही वाचाळवीर वाट्टेल त्या भाषेत दुस-यावर टीका करतात. कधी कधी धार्मिक तेढ निर्माण होईल, कोणाच्या भावना दुखावतील, याचा देखील विचार करत नाहीत.

साहेब खरंच आपल्याला शिकवलेल्या हिंदुत्वात दुस-याचा द्वेष करायला शिकवले जाते का, असा सवाल उपस्थित करून बोडखे यांनी पुढे म्हटले आहे की, मी देखील हिंदू आहे, परंतु माझ्यावर झालेल्या संस्कारात प्रत्येकाचा आदर करणे प्रत्येक समाजाचा सन्मान राखणे तसेच राजकारणात मतभेद असावे पण मनभेद असू नये, असे शिकविले आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे.

कित्येक दिवसांपासून असल्या वाचाळवीर नेत्यांच्या वक्तव्याची चीड येते आहे. या वक्तव्यांमुळे तुम्ही केलेल्या कामाला कुठे तरी तडा जात आहे, वाचाळवीरांना आवर घालण्यापेक्षा त्यांचे नेते जलेबी सारखे शब्द घुमवत त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना दिसतात. अशा वातावरणात काम करण्याची मनापासून इच्छा होत नाही, म्हणून मी आपल्या शिवसेना प्रवक्ता व पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे बोडखे यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेनेत फुट पडल्यानंतर बोडखे यांनी उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत राहणे पसंत केले होते. पण फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी मनीषा कायंदेंसह इतर महिला नेत्यांवर गंभीर आरोप करत त्यांची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आठ महिन्यांतच त्यांनी शिंदेचीही साथ सोडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT