Shivsena News : राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी लातूर येथील एका सेवाभावी संस्थेला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी दिलेला प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. विशेष म्हणजे राऊत यांनी संबंधित व्यक्तीलाच माध्यमांसमोर हजर करत घडलेल्या प्रकाराचे कथन करायला लावले.
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक गैरव्यवहार, बेकायदा जमीन वाटप, एमआयडीसीतील भूखंड, हाॅटेल खेरदीतून बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत तक्रार केली होती. हे प्रकरण न्यायालयात असताना आता संजय राऊत यांनी केलेल्या या नव्या आरोपामुळे शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. संजय राऊत हे बुधवारी (ता.25) छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांच्यासमोर संजय शिरसाट यांच्याविरोधात पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणारे नरसिंग उदगीरकर हे देखील उपस्थित होते. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त संचालक विश्वास नांगरे पाटील यांना उदगीरकर भेटले होते. त्यांनी आपल्याला पाच कोटी रुपयांची लाच थेट मंत्र्यांकडून मागण्यात आली आहे, आपण सापळा रचून त्यांना पकडू या, अशी मागणी केली.
त्यानंतर लगेच ही टीप मंत्रालयात पोहचली, संबंधित मंत्र्यांना तुमच्या विरोधात सापळा रचला जात आहे, अशी माहिती पुरवली गेली हे तुमचे गृहखाते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. सेवाभावी संस्थेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी थेट मंत्री लाच मागतो, ही किती लाजिरवाणी बाब आहे, असेही राऊत म्हणाले.
अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेंटरच्या प्रस्तावासाठी 5 कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. लातूर येथील नरसिंग उदगीरकर यांच्या आरती सेवाभावी संस्थेमार्फत उदगीर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेंटरसाठी 25 कोटी रुपयांचा प्रस्ताव 6 ऑक्टोबर 2025 रोजी समाजकल्याण मंत्रालयात सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी प्रस्तावाच्या 20 टक्के म्हणजे सुमारे 5 कोटी रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप नरसिंग उरगीर यांनी केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
मुंबईतील 72व्या मजल्यावरील खासगी निवासस्थानी बोलावून लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. लाचेची रक्कम न दिल्यामुळे प्रस्ताव मंजूर करण्यात आला नसल्याचा दावा नरसिंग उदगीरकर यांनी केला. अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने 5 कोटींची लाच मागितली जाते. देवेंद्रजी, हा असला दलितोद्धार काय कामाचा?” असा सवाल करत राऊत यांनी नरसिंग उदगीरकर यांनाच माध्यमांसमोर हजर केले.
अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं लातूरच्या उदगीरमध्ये ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी त्यांनी एक प्रस्ताव समाज कल्याण मंत्रालयाकडे सादर केला होता. सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. अधिकृत प्रस्तावाच्या साधारण 25 कोटी रुपयांचं ते ट्रेनिंग सेंटर, ज्याच्यामध्ये दलित मुलांना, मातंग समाजाच्या मुलांना, अण्णाभाऊ साठेंच्या समाजाच्या मुलांना स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण मिळावं किंवा इतर काही शैक्षणिक कार्यक्रम त्यातून व्हावेत, यासाठी तो प्रस्ताव त्यांनी सादर केला.
खरं म्हणजे अशा प्रकारच्या प्रस्तावांसाठी फार वाट पाहायला लागू नये. पण हे नरसिंग उदगीरकर जे आहेत ते वारंवार हेलपाटे मारत राहिले आणि एक दिवस त्यांना मंत्र्यांच्या त्यांचे एक ओएसडी आहेत सिद्धार्थ भंडारे म्हणून, ते म्हटले की मंत्र्यांना भेटल्याशिवाय तुमचं काम होणार नाही. बरोबर आहे मंत्र्यांना भेटल्याशिवाय काम होणार नाही. महाराष्ट्र हा आर्थिक दृष्ट्या फार मोठं राज्य आहे. हजारो कोटींचं बजेट आहे. अहो मुंबई महानगरपालिकेचं बजेट दोन राज्यांपेक्षा मोठं आहे. आमच्या महानगरपालिकांचं बजेट मोठं आहे, पण 25 कोटींसाठी मंत्र्यांना भेटावं लागेल, असा आरोपही राऊत यांनी यावेळी केला.
मंत्र्यांनी त्यांना आपल्या खाजगी निवासस्थानी बोलावले. नाथाणी हाइट्स म्हणून 72 व्या मजल्यावरून अख्खी मुंबई दिसते आणि ते असे समोरासमोर बसले मंत्री डीलिंगला. आणि त्यांना म्हणाले की, 25 कोटी मंजूर करतो, पण तुला मला 5 कोटी रुपये द्यावे लागतील. साहेब मी हा विषय मातंग समाजाचा अण्णाभाऊ साठेंच्या नावाने आपण करतो आहोत, दलित बांधवांसाठी करतो आहोत, 5 कोटी रुपये कुठून देऊ? थोडंफार मी तुम्हाला देऊ शकेन, पण 5 कोटी आता माझ्याकडे नाहीत. मग तुझा प्रस्ताव मंजूर होणार नाही, तुझा प्रस्तावच मंजूर होणार नाही आणि अजूनही तो प्रस्ताव मंजूर झाला नाही.
5 कोटी रुपयांसाठी मंत्री स्वतः डील करतो देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आणि हे बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतात आम्ही शिवसेना. त्यांचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे त्यांना माझं आव्हान आहे, मी जे सांगतोय हे तथ्य तपासा हे नरसिंग उदगीरकरांना बोलवा, ते काय सांगतात ते समजून घ्या. उदगीरकरांनी लाचलुचपत खात्याचे अतिरिक्त संचालक असलेले विश्वास नांगरे पाटील यांना भेटले हे सर्व घेऊन की हे असं असं आहे. मंत्री पैसे मागतो, मंत्री पैसे मागतोय आपण सापळा रचूया आणि महाराष्ट्राला दाखवूया.
पण हे कळताच मंत्री सांगतात आता तर मी लाच घेतल्याशिवाय तुमचा प्रस्तावच मंजूर होऊ देणार नाही. म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची काय प्रतिष्ठा आहे महाराष्ट्राच्या? तिथे गेल्यावरती मंत्री परत अरेरावीने सांगतात माझ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात तुम्ही तक्रार करता आता तर मी लाच घेणारच. हे पहिलं प्रकरण नाही अशी त्यांची 27 प्रकरणं माझ्याकडे आहेत शिरसाटांची. प्रत्येक प्रस्तावात त्यांनी किती पैसे घेतले आहेत, प्रत्येक प्रस्ताव त्यांचा माझ्याकडे आहे.
जर उदगीरकर यांच्या एका प्रस्तावात ते 5 कोटी घेत आहेत, असे किती प्रस्ताव मंजूर झाले आहेत गेल्या त्यांच्या कारकिर्दीत हे सगळं आहे. तो आकडा किती कोटींचा आहे हे त्यांना माहिती आहे. प्रत्येकाचे पैसे कुठे कसे स्वीकारले हे माझ्याकडे आहे. त्यांनी राजीनामा द्यावा, धक्का मारून काढण्यापेक्षा. महाराष्ट्र हादरून जाईल. जर एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राशी थोडी जरी प्रतिष्ठेविषयी चाड असेल तर त्यांनी अशा मंत्र्यांना ताबडतोब बाहेर केलं पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.