MLC Election : पाच जागांसाठी जाहीर झालेली विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याने राज्याला नवीन 5 आमदार मिळाले आहेत. भाजपकडून दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी, राष्ट्रवादीकडून संजय खोडके आणि शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी अशी या नव्या आमदारांची नावे आहेत.
त्याचवेळी या निवडणुकीत तिन्ही पक्षातील ज्यांच्या नावांची चर्चा होती, त्यांना संधी न मिळाल्याने हे इच्छुक नाराज झाले आहेत. ही यादी मोठी आहे. पण या इच्छुकांनी आता खचून न जाता पुन्हा तयारीला सुरूवात केली आहे. कारण अजूनही विधान परिषदेच्या तब्बल 21 जागा रिक्त आहेत. या जागांवर डोळा ठेवून सगळेच आपआपल्या परिने फिल्डिंग लावत आहेत.
महाराष्ट्र विधानपरिषदेची 78 सदससंख्या आहे. यातील 30 सदस्य विधानसभा सदस्य निवडून देतात. 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येतात. तर 7 सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून आणि 7 सदस्य शिक्षक मतदारसंघांमधून निवडून येतात. याशिवाय कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा अशा क्षेत्रातील विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या 12 व्यक्तींची राज्यपालांद्वारे नियुक्ती केली जाते.
काही दिवसांपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 पैकी 6 सदस्यांची नियुक्ती झाली आहे. तर अद्याप 6 जागा रिक्त आहेत. याशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्धांच्या निवडणुका रखडल्याने आहेत. त्यामुळे 22 पैकी निवृत्त झालेल्या तब्बल 15 सदस्यांच्या जागेवरही निवडणूक झालेली नाही. त्यामुळे राज्यपाल नियुक्त 6 आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येणाऱ्या 15 अशा 21 जागा आज घडीला रिक्त आहेत.
यातीलच छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील आमदार अंबादास दानवे यांची मुदत येत्या 29 ऑगस्ट रोजी संपत आहे. तर विधानसभा सदस्यांमधून निवडून येणाऱ्या 9 आमदारांची, शिक्षक मतदारसंघातील 2 आणि पदवीधर मतदारसंघातील 3 अशा 14 जणांच्या आमदारकीची मुदत पुढील वर्षाअखेरीपर्यंत संपत आहे.
त्यामुळे इथेही मोठ्या प्रमाणात इच्छुकांकडून लॉबिंग होण्याची शक्यता आहे. आता या जागांवर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार किंवा अन्य इच्छुकांमध्ये कोणाकोणाला संधी मिळणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. पण येत्या काळात या 21 आणि पुढील वर्षी मुदत संपणाऱ्या 14 या जागांवर कमालीचे धुमशान बघायला मिळणार हे नक्की.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.