Shiv sena News : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं या याचिकेवर सध्या सुप्रीम कोर्टात सलग सुनावणी सुरु आहे. आज मंगळवार या सुनावणीचा पाचवा दिवस होता. यावेळी देखील ठाकरेंच्यावतीनं ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. यामध्ये त्यांनी संविधानातील १० व्या शेड्युलचा प्रमुख मुद्दा उपस्थित करत या कलमाची संपूर्ण चिरफाड केली. तसंच या कलमानुसार, निवडणूक आयोगानं जे करणं अपेक्षित आहे ते त्यांनी केलेलं नसल्याचा दावाही केला. त्याअनुषंगानं पुढच्या सर्वच नियुक्त्या कशा चुकीच्या होत्या हे देखील त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.
कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. आजच्या सुनावणीत त्यांनी शेड्युल १० चा मुद्दा उपस्थित केला. यामध्ये त्यांनी म्हटलं की, विधानसभा अध्यक्षांनी १० व्या शेड्युलनुसार मिळालेल्या अधिकारांचं उल्लंघन केलं आहे. तसंच पक्षांतरबंदी कायद्याशी सुसंगत नसल्याची प्रक्रिया त्यांनी राबवली. तसंच शिवसेनेतील नेतृत्व बदलाकडं साफ दुर्लक्ष केलं. तर तिसरा मुद्दा म्हणजे केवळ बहुमत असलेले आमदार म्हणजे तो राजकीय पक्ष होऊ शकत नाही, पण तसा निष्कर्ष निवडणूक आयोगानं काढला हा चुकीचा आहे.
कपिल सिब्बल पुढं म्हणतात, हा निर्णय केवळ सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्र शासन प्रकरणातील विरोधात नाही. तर कायद्यातील सर्व तत्वांच्या विरोधात आहे. विधीमंडळ पक्ष आमदार-खासदार असतात. तसंच राजकीय पक्ष हे एकच नसतात.
निवडणूक माझ्या स्वतःच्या नेतृत्वाखली लढवली गेली आणि त्यांच्या पक्षाचं चिन्हही माझ्याच नेतृत्वाखाली मिळालं. हे आम्हाला मान्य नाही त्याला कायदेशीर मान्यता देण्याची गरज नाही. थेट अधीक्षकांच्या अधिकार क्षेत्रावर आता कपिल सिब्बल यांनी अनेक प्रश्न उपस्तिथ केलं आहे.