Ravi Rana, Navneet Rana .jpg
Ravi Rana, Navneet Rana .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

राणा दाम्पत्य नजरकैदेत; अमरावतीमधील शिवरायांचा पुतळा मध्यरात्री हटवला

सरकारनामा ब्युरो

अमरावती : अमरावीतमध्ये आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने राजापेठ उड्डाणपुलावर बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) मध्यरात्री पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आला आहे. महानगरपालिका, अतिक्रमण विभाग आणि शहर पोलिस यांच्या संयुक्त कारवाईत हा पुतळा हटवण्यात आला आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी राणा दाम्पत्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी (बुधवारी-ता.१२) आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. त्यासाठी परवानगी घेण्यात आली नसल्याने आधीपासूनच वाद निर्माण झाला होता. महापालिकेने हा पुतळा हटविण्याच्या संदर्भात हालचालीही सुरू केल्या. मात्र त्याआधीच दोन दिवसांपुर्वीच रवी राणा यांनी महापालिकेत बैठक घेऊन महापालिकेच्या आमसभेत हा विषय ठेवून त्या पुतळ्याला अधिकृत मान्यता देण्याबाबत प्रशासनाला सुचना केली होती.

मात्र रविवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास प्रचंड पोलिस बंदोबस्तात महानगरपालिका, अतिक्रमण विभाग आणि शहर पोलिस यांच्या संयुक्त कारवाईत हा पुतळा हटविण्यात आला. यानंतर शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी प्रत्येक चौकात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या निवासस्थानी सुद्धा राज्य राखीव पोलिस दल आणि शहर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन अमरावतीत नव्या राजकारणाला परत एकदा सुरवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दररोज सायंकाळी राजापेठ उड्डाणपुलावरील या पुतळ्याच्या ठिकाणी अभिषेक, पूजा करण्यात येत होती. विविध संघटनांचे पदाधिकारी सुद्धा तेथे येत होते. त्यामुळे ही अमरावतीकरांची मागणी होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे बसविण्यात आल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT