Uddhav Thackeray, Sharad Pawar
Uddhav Thackeray, Sharad Pawar sarkarnama
महाराष्ट्र

शिवसेनेला खटकतीय राष्ट्रवादीची नरमाई; ठाकरेंची थेट पवारांकडे तक्रार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाविकास आघाडीमधील वरिष्ठ आणि स्थानिक पातळीवरील कुरबुरी कायम आहेत. स्थानिक पातळीवर शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते-कार्यकर्ते एकमेकांवर सातत्याने कुरघोडी करत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचवेळी वरिष्ठ पातळीवरही नाराजी आहे. काँग्रेसच्या (Congress) २५ आमदारांनी महाविकास आघाडीला गॅसवर ठेवले असताना दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वरिष्ठ पातळीवर नाराजीचे सुर आहेत.

आधी निधी वाटपात आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरमाईच्या भूमिकेवर शिवसेना समाधानी नसल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील डझनभर नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. त्यावरून आक्रमकपणे भूमिका घेत विरोधी पक्ष भाजपला शिवसेना अंगावर घेत आहे. मात्र राष्ट्रवादीने नरमाईची भूमिका घेतल्याने शिवसेनेच्या गोटात नाराजी आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार याबाबत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा केली आहे.

भाजपविरोधातील लढाई आम्हीच लढत आहोत. शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिक फ्रंटफूटवर आहेत. पण त्याचवेळी राष्ट्रवादी मात्र बॅकफूटवर आहे. राष्ट्रवादीने ज्याप्रकारे भाजपशी दोन हात करायला हवेत, तसे त्यांच्याकडून होताना दिसत नाही,' अशी तक्रार शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने एक्स्प्रेस सोबत बोलताना सांगितली आहे. सोबतच राष्ट्रवादीने भाजपविरोधात कधी कधी 'सॉफ्ट' भूमिका घेतली, त्याच्या उदाहरणांची यादीच शिवसेनेतील या सुत्रांनी दिली आहे.

यात १३ मार्च रोजी मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना बीकेसीतील मुंबई पोलिसांच्या सायबर विंगमध्ये जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. मात्र त्यावेळी गृह मंत्रालयाने अचानक निर्णय बदलला. पोलिस अधिकारीच फडणवीसांच्या निवासस्थानी गेले. शिवसेनेला हीच बाब चांगलीच खटकली. गृह मंत्रालय ज्याप्रकारे पोलीस दल हाताळत आहे, त्याबद्दल शिवसेना समाधानी नाही. सोबतच नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर शिवसेना आणि भाजपचे नेते एकमेकांवर तोफ डागू लागले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेले विधान शिवसेनेला रुचलेले नाही. 'दोन्ही बाजूंनी शांत व्हावं आणि परिस्थिती हाताबाहेर जायला देऊ नये,' असं पवार म्हणाले होते.

याशिवाय भाजपच्या १२ आमदारांना विधानसभेतून निलंबित केल्यानंतरही अजित पवारांनी घेतलेली भूमिका शिवसेनेला पटली नव्हती. आमदारांना काही तास किंवा दिवसांसाठी निलंबित केले जाऊ शकते. पण १२ महिन्यांचा कालावधी जास्त असल्याचे मत अजित पवारांनी व्यक्त केले. २८ मार्चला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा खासदार माजिद मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. या सर्वच गोष्टींवरुन शिवसेना राष्ट्रवादीवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT