State Election commission Ajit Pawar eknath shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Election Commission Action: प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच राज्याच्या राजकारणातून सर्वात धक्कादायक अपडेट! अजितदादा, शिंदेंसह 20 नेतेमंडळी अडचणीत

Local Body Election 2025 : राज्यातील स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी प्रलोभनं दाखवणार्‍या नेत्यांची राज्य निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतल्याचं माहिती आहे. आयोगाकडून आता या नेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर सुमारे एक वर्षानंतर पुन्हा एकदा निवडणुकांमुळे राजकारण ढवळून निघालं आहे.गेल्या जवळपास साडेचार ते पाच वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार प्रचंड वादळी ठरला. या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान, विरोधकांसह सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षांनीही एकमेकांवर टीका करताना कोणतीही मर्यादा पाळली नाही. यात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह (Ajit Pawar) काही प्रमुख नेत्यांनी तर मत द्या,निधी देतो, तिजोरीच्या चाव्या यावरुन राजकारण तापवत मतदारांना प्रलोभनं दाखवली. प्रलोभनं दाखवणं या नेत्यांना भोवणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे.

राज्यातील स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी प्रलोभनं दाखवणार्‍या नेत्यांची राज्य निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतल्याचं माहिती आहे. आयोगाकडून आता या नेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री,आमदार,नेतेमंडळी यांनी प्रचारादरम्यान,टीकेची पातळी सोडताना काही निधीबाबत किंवा इतर काही वादग्रस्त विधानं केल्याचं दिसून आलं होतं.

राज्य निवडणूक आयोगानं (State Election Commission) आता राज्यभरात स्थानिक निवडणुकांच्या प्रचारावेळी ज्या ठिकाणी संबंधित नेत्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत, त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीनं अहवाल मागवला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, जयकुमार गोरे, चित्रा वाघ यांच्यासह तब्बल 20 नेत्यांच्या वक्तव्यांवर आयोग मोठी कारवाई करणार असल्याचं बोललं जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी वाटपावरुन तिजोरीच्या चाव्या, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून लक्ष्मीदर्शन, एकनाथ शिंदे यांच्याकडून योजना, तिजोरीच्या चाव्यांसंबंधीचं विधान, चित्रा वाघ यांच्याकडून 'खा कुणाचं पण मटण मात्र दाबा कमळाचं बटण',मंत्री चंद्रकांत पाटील यांचं तिजोरीचे मालक मंत्री जयकुमार गोरे यांनीही लाडक्या बहि‍णींबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. अशा वक्तव्यांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतल्यामुळे ही नेतेमंडळी चांगलीच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, महिलांनो, आपला देवाभाऊ दर महिन्याला खात्यात 1500 रुपये पाठवतो. त्या दीड हजारांशी इमान राखा. आपण भावाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असं वक्तव्य केलं होतं. महिलांना स्वाभिमान आणि सन्मान याच देवाभाऊंनी दिला.

आपण पाहिले, पूर्वी 100 रुपयांसाठी नवऱ्याकडे, नाहीतर घरातल्या माणसाकडे हात पसरावे लागत होते. आज अकाऊंटमध्ये महिलांना पैसे येतात. ज्या बहिणीला पूर्वी हात पसरावे लागत होते, आज तिलाच तिचा नवरा विचारतो, तुझ्या खात्यात काही शिल्लक आहेत का? हा सन्मान देवाभाऊंनी आणि भाजपाने दिला आहे. अशा भावाला विसरू नको”, असे आवाहन गोरे यांनी केले.

निवडणुकांच्या दरम्यान, ज्या ठिकाणी नेत्यांच्या सभा असतात, तिथे निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कॅमेरे असतात. त्याच्या आधारे आता नेतेमंडळींनी प्रचारादरम्यान केलेल्या आक्षेपार्ह आणि प्रलोभनात्मक विधानांचा तपास केला जाणार आहे. यात 20 नेते अशी आढळून आली आहे, ज्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या कारवाईची टांगती तलवार आहे.

राज्यातील 24 नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. या निवडणुकांसाठी आता 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला निकाल असणार आहे. मात्र, ऐनवेळी शेकडो प्रभागातील नगरसेवकपदाच्याही निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्या आल्यामुळे सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षाचेही कार्यकर्ते आणि पदाधिकारी, उमेदवारांची घोर निराशा झाली आहे. निवडणुकीसाठी मतदानाच्या एक दिवस अगोदरच आयोगाने निवडणुका पुढे ढकलण्याचे निर्देश दिल्याने मोठा धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT