संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण

 

सरकारनामा

महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुन्हा चर्चेत

भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर असले तरी विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विधीमंडळ अधिवेशनाचा (Assembly winter session) आज पहिलाच दिवस आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक होत आहे, तर दुसरीकडे विधानसभेच्या अध्यक्षाची निवड २७ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस नेत्यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर ही माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली.

भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर असले तरी विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचे नेते होते. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची जागा रिक्त आहे.

या हिवाळी अधिवेशनात अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात येणार याबाबत माहिती आली नाही. परंतु काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते नितीन राऊत, सुनिल केदार दिल्लीत गेले होते.

हिवाळी अधिवेशनाला काही तास उरले असताना राज्यातील काँग्रेसचे बडे नेते मंगळवारी दिल्लीत दाखल झाले होते. काँग्रेसच्या नेतृत्वासोबत या नेत्यांची बैठक झाली. विधानसभा अध्यक्षांच्या नावावर या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.

नाना पटोले, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार हे दिल्लीत होते. नागपूरमध्ये विधान परिषद निवडणुकीत उमेदवारीवरून जो घोळ झाला त्यावरून या तिघांना बोलविल्याची प्राथमिक चर्चा होती. मात्र विधीमंडळाच्या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड होणार असल्याने साहजिक त्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्यांपैकी एकाला काँग्रेस विधानसभा अध्यक्षपद देणार आहे. यामुळे आता हे अध्यक्षपद कोणाला जाणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचा असणार आहे. तर अध्यक्षांची निवड विधानसभेत आवाजी मतदानाने करण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्षपदाची निवड होण्याची शक्यता निर्माण झाली होती, पण आता ही निवड २७ तारखेला होणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

आरोग्य विभाग भरती, म्हाडा परीक्षा, टीईटी परीक्षा, महिला सुरक्षा, ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्द विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तापण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या अधिवेशनाला उपस्थित राहणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT