Teacher recruitment Sarkarnama
महाराष्ट्र

Non teaching to teaching policy : शिक्षकेत्तर पदावरून शिक्षक पदावरील नियुक्तीबाबतची तरतूद रद्द; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Teacher appointment rule cancelled : राज्यात शिक्षक अभियोगयता व बुध्दीमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीबाबतचा निर्णय सन २०१७ पासून शासनाने घेतलेला आहे.

Rajanand More

State Government education decision : राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालायातील शिक्षकांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर त्यांना शिक्षणसेवक पदावर नियुक्ती दिली जात होती. सरकारने या निर्णय आता रद्द केला आहे. त्यामुळे यापुढे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना केवळ शैक्षणिक पात्रतेच्या आधारे शिक्षणसेवक पदावर नियुक्ती मिळणार नाही.

शालेय शिक्षण विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयामध्ये माध्यमिक शिक्षण विभागाच्या १० जून २००५ मधील शासन पूरकपत्राचा संदर्भ देण्यात आला आहे. या पूरकपत्रामध्ये शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती देण्याबाबतची तरतूद करण्यात आली होती. आजच्या शासन निर्णयाने ही तरतूद अधिक्रमित करण्यात आली आहे.

काय होती तरतूद?

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याने माध्यमिक शिक्षकांसाठी वा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता प्राप्त केली आणि जर त्या संवर्गाचे पद माध्यमिक शाळेत वा उच्च माध्यमिक शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल तर, अशा प्रकरणी सदरहू शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यास शिक्षणसेवक म्हणूनच नियुक्ती द्यावी लागेल व त्यांना शिक्षणसेवकांचेच मानधन आणि इतर सर्व अटी व शर्ती लागू होतील. मात्र अशा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा ही सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरता येईल.

का केली रद्द?

राज्यात शिक्षक अभियोगयता व बुध्दीमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीबाबतचा निर्णय सन २०१७ पासून शासनाने घेतलेला आहे. यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर नियुक्ती होत आहे.

असे असताना शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोणत्याही स्पर्धेशिवाय केवळ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या आधारावर शिक्षक/शिक्षण सेवक पदावर नियुक्ती केली जाणे, ही बाब विद्यार्थ्यांची अध्यापन प्रक्रिया व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्ता बाधित करणारी आहे. त्यामुळे वरील तरतूद अधिक्रमित करण्यात आल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षकेत्तर पदावरुन शिक्षक/शिक्षण सेवक पदावर नियुक्तीबाबत कोणत्याही शासन निर्णयात, परिपत्रकात, संलेखात असलेल्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तरतुदी देखील त्या मर्यादेत तात्काळ प्रभावाने अधिक्रमित करण्यात येत असल्याचे बुधवार जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT