Pune Purandar airport land acquisition funding approval 2026: अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज झाली. उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारत सुनेत्रा पवार यांनी बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात प्रवेश केला. त्यांनी अजितदादांच्या फोटो अन् खुर्चीला अभिवादन केलं.
या वेळी त्यांच्याबरोबर पार्थ पवार देखील उपस्थित होते. दोघेही मायलेक यावेळी भावूक झाले होते. दालनातील वातावरण देखील यामुळे गहिवरून गेलं. यानंतर सुनेत्रा पवार यांनी बैठकीला हजेरी लावत पुण्यातील पुरंदर इथल्या प्रस्तावित विमानतळाबाबत मोठा निर्णय घेतला.
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्य मंत्रिमंडळातील ही पहिलीच बैठक होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वेगवेगळे निर्णय झाले. यात पुणे जिल्ह्यातील पुरंदर इथल्या प्रास्ताविक विमानतळाबाबत महत्त्वाचा निर्णय झाला. या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर दिली.
पुणे (Pune) जिल्ह्यातील संभाजी महाराज यांच्या नावाने पुरंदर इथं विमानतळ होत आहे. या विमानतळासाठी लागणाऱ्या भूमी अधिग्रहणाला मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. जो काही निधी लागणार आहे तो उभारण्यासाठी मान्यता दिली आहे. यासंदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. एकूण 96 टक्के लोकांनी जमीन अधिग्रहणाला परवानगी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
यामुळे लगेचच जमीन अधिग्रहण केलं जाणार आहे. ज्यांची परवानगी मिळाली नाही, त्यांच्या काही कायदेशीर अडचणी दिसत आहेत त्यादेखील आम्ही दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 1 जूनपर्यंत भूमी अधिग्रहण करण्याचे नियोजन आहे. 6 महिन्याचा अवधी दिला असला तरी 1 जूनपर्यंत हे पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
अजित पवारांच्या दु:खद निधनानंतर आज पहिलीच मंत्रिमडंळाची बैठक होती. यात शोक प्रस्ताव मान्य करण्यात आला. सुनेत्रा पवार यांची पहिली बैठक होती. पण दुखवटा असल्याने फक्त औपचारिक स्वागत केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस कालच्याही निवडणुकीत चांगली कामगिरी केली आणि भविष्यातही करेल, असा विश्वास व्यक्त करत, विलिनीकरणाचा विषय त्यांच्या पक्षाचा आहे. त्यात मी बोलणं योग्य नाही. आमचं काही ठरलं आहे, असं सांगतील तेव्हा त्यावर प्रतिक्रिया देईन. उगाच पतंग उढवण्यात अर्थ काय, असं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर जास्त भाष्य करण्याचे टाळले.
अजितदादांनी घेतलेल्या 3 महत्वपूर्ण निर्णयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब केलं. बारामती क्रीडा संकुलाला 75 कोटी रुपये मंजूर केले. तसेच वालचंदनगर-रत्नापूर MIDC साठी 1000 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर राज्यात 11 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निधनापूर्वी काही दिवस अगोदर अजितदादांनी महसूलमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा घेतला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.