Sunil Tatkare on Prashant Kishor: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यामध्ये सहा तास बैठक पार पडली. या बैठकीत किशोर यांनी सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्यात यावं, अशी सूचना केल्याच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. या चर्चांवरच खुद्द सुनील तटकरे यांनी भाष्य केलं आहे. प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवारांच्या भेटीला त्यांनी दुजोराही दिला आहे. पण त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत सुरु असलेल्या चर्चांवर त्यांनी सविस्तर भूमिकाही मांडली.
तटकरे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, "प्रशांत किशोर आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट झाली आहे. पण या बैठकीबाबत मला जास्त काही माहिती नाही. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय सल्लागार नेमल्याची मला अद्याप माहिती नाही. त्यामुळं मला याची माहिती नसल्यानं त्यांची नियुक्ती झालीच नसेल असं मला वाटतं. त्यामुळं आता राज्यातील राष्ट्रवादीतील नेतृत्व बदल करण्याची चर्चा सुरु आहे त्यात काही तथ्य नाही. सुनेत्रा वहिनी आणि आमचा कोअर ग्रुप आहे, त्यामुळं पक्षातील निर्णय हे एकत्र बसूनच होतात. त्यामुळं मला वाटतं आम्हाला कोणत्याही रणनितीकाराची गरज नाही.
नुकत्याच झालेल्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि इतर नियुक्त्यांच्यांबाबत आमची आधी चर्चा झालीच होती. त्यानुसार, सुनेत्रा वहिनींनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीची पत्र दिली. पण ती माझ्या सहीनं दिलेली आहेत. त्यामुळं त्यात वावग वाटण्याचा कारणच काय? आता इतर पक्षातही अशा पद्धतीनं नियुक्त्या दिल्या जातात पण राष्ट्रवादीबाबतच असे प्रश्न का निर्माण होतात माहिती नाही.
माध्यमांमध्ये विश्वसनीय सुत्रांच्या हवाल्यानं राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांना शिफारस केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यावरुन तटकरे माध्यमांवरच भडकले आणि म्हणाले, "तुमच्या सुत्रांपेक्षा माझं गोत्र मला माहिती आहे. आख्खा महाराष्ट्र आठ वेळा पालथा घालणारे महाराष्ट्रातील जे कोणी मोजके लोक आहेत त्यांपैकी मी एक आहे. त्यामुळं मला सलगपणानं सर्व मतदारसंघ तालुके सांगता येऊ शकतात. त्यामुळं कोणाला काय वाटतं? याचा विचार करण्याची आजची स्थिती नाही.
मी ४१ वर्षे राजकारणात आहे. माझी सुरुवात १९८५ पासून काँग्रेसपासून झाली तेव्हाच मला तिकीट मिळालं. माझा ४१ वर्षाचा प्रवास असाच झालेला नाही. रायगड सारख्या सजग असलेल्या जिल्ह्यात मी आजवर काम केलेलं आहे" अशा शब्दांत आपण सध्याच्या प्रदेशाध्यपदासाठी का योग्य व्यक्ती आहोत हेच एकीकडं तटकरेंनी सुचित केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.