Supriya Sule shares old photos with Ajit Pawar: रक्षाबंधन, हा भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा, प्रेमाचा आणि आयुष्यभराच्या विश्वासाचा दिवस. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्या सुखासाठी, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी यंदाची राखीपौर्णिमा डोळ्यांत पाणी आणणारी ठरली आहे.
कारण, आपला भाऊ, लाडका ‘दादा’ सोबत नसल्याची दु:खद भावना सुप्रिया सुळेंना अस्वस्थ करत आहे. हेच त्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका भावनिक पोस्टमधून दिसत आहे. “प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा… पण यावेळी तू सोबत नाहीस. ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे,” अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावाच्या आठवणींना वाट मोकळी करून दिली.
अजित पवार यांच्या अचानक जाण्याचा धक्का आजही मनातून गेलेला नाही. त्यांनी लिहिलं की, "सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं… यावर आजही विश्वास बसत नाही," असं म्हणत त्यांनी अजितदादांच्या अपघाती निधनाच्या दु:खद आठवणींचा उल्लेख केला आहे.
“आजही वाटतं, तू अचानक येशील…”
भाऊ-बहिणीच्या नात्यातील बालपणीच्या आठवणींनाही सुप्रिया सुळे यांनी या पोस्टमधून उजाळा दिला आहे. त्यांनी लिहिलं, "लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या नात्याचा पाया होता. आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील.
तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे.", असं म्हणत सुप्रिया सुळे या भाऊ अजितदादांच्या आठवणीत भावूक झाल्या आहेत