राज्यभरातील लाखो शिक्षक पदाच्या इच्छुक उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकारानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आली असली, तरी उमेदवारांना पुन्हा नोंदणी करण्याची किंवा अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज भासणार नाही, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आधीच अर्ज केलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे येथील परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या TET परीक्षेची प्रश्नपत्रिका ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात फुटल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर संपूर्ण परीक्षा प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
राज्यात एकूण 37 ठिकाणी ही परीक्षा आयोजित करण्यात येणार होती. त्यासाठी 1,728 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे 6,12,125 उमेदवार या परीक्षेला बसणार होते. मात्र पेपरफुटीच्या घटनेमुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली.
परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की, ज्या उमेदवारांनी आधीच अर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही. तसेच कोणत्याही उमेदवाराकडून अतिरिक्त परीक्षा शुल्कही आकारले जाणार नाही. या प्रकरणात उमेदवारांचा कोणताही दोष नसल्याने त्यांच्यावर कोणताही आर्थिक भार टाकला जाणार नाही.
सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. चौकशीचा अंतिम अहवाल आल्यानंतर संबंधितांविरोधात पुढील कायदेशीर पावले उचलली जातील. नव्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असून साधारणपणे अशा परीक्षेचे नियोजन करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. परीक्षा नेमकी कधी होणार याबाबतची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.