AIMIM-Mahavikas Aghadi Sarkarnama
महाराष्ट्र

Imtiaz Jaleel News : महाविकास आघाडीचे नेते एमआयएमला भाव देईना, इम्तियाज यांचाही थेट इशारा..

Jagdish Pansare

AIMIM-Mahavikas Aghadi News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील एमआयएमचे निवडून आलेले खासदार इम्तियाज जलील यांचा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. ज्या वंचित बहुजन आघाडीच्या मदतीने एमआयएम ने संभाजीनगरात विजय मिळवत झेंडा फडकवला होता, त्या वंचितनेही पाच वर्षापुर्वी म्हणजेच 2019 मधील विधानसभा निवडणुकीपूर्वीच एमआयएमची साथ सोडली होती. याचा फटका संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात पक्षाला बसला.

शिवाय एमआयएमकडे (AIMIM) वळलेला मुस्लिम मतदार या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिला. मोठ्या कष्टाने वळवलेली मुस्लीम वोट बॅंक फुटल्याने एमआयएमच्या पायाखालची वाळू सरकल्याचे बोलले जाते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अस्तित्व महाराष्ट्रात टिकवण्यासाठी एमआयएमला आता नव्या मित्राची नितांत गरज भासू लागली आहे. लोकसभा निवडणुकी आधीपासून एमआयएमचे महाविकास आघाडी सोबत जाण्याचे प्रयत्न सुरू होते.

मात्र जातीयवादाचा शिक्का बसलेल्या एमआयएमला महाविकास आघाडीने दूरच ठेवले. परिणामी लोकसभा निवडणुकीत एमआयएमच्या एकमेव खासदार इम्तियाज जलील यांचाही पराभव झाला. विधानसभेला राज्यात पक्षाची स्थिती सुधारावी यासाठी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी समोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. इम्तियाज यांच्या दाव्यानुसार मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीच्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी एमआयएमला सोबत घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली होती. मात्र पुन्हा या नेत्यांनी चुप्पी साधली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज जाहीरपणे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांना साद घालत आम्हाला महाविकास आघाडी सोबत घेण्याचा निर्णय लवकर घ्या. (Mahavikas Aghadi) अन्यथा येत्या आठ सप्टेंबर पासून आम्ही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना अर्जाचे वाटप सुरू करू, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

महाविकास आघाडीने आम्हाला सोबत घेतले तर भाजपला पराभूत करणे सोपे जाईल. शिवाय आमच्या अपेक्षाही जास्त नाहीत, आमच्या ताकदीचा आम्हाला अंदाज आहे. त्यामुळे जिथे पक्षाची ताकद आहे तिथेच आम्ही जागा मागू. त्यामुळे आता अधिक वेळ न दवडता महाविकास आघाडीने आमच्या बाबतचा निर्णय घ्यावा.

पवार, ठाकरे, पटोले यांनी येत्या आठ तारखेपर्यंत निर्णय जाहीर केला नाही, तर संभाजीनगर मध्ये पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभा इच्छुक उमेदवारांना अर्जांचे वाटप सुरू करणार आहोत. मग आमच्यामुळे भाजपचा फायदा झाला, अशी बोंब मारू नका. मग आम्ही कुठे आणि किती जागा लढवायच्या हे ठरवू आणि आमची किती ताकद आहे हे तुम्हाला दाखवून देऊ, अशी धमकी वजा इशारा इम्तियाज यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT