Maharashtra News : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यात होणाऱ्या अश्लील लावणी नृत्य कार्यक्रमांवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच असे कार्यक्रम आयोजित केले तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनाही इशारा दिला आहे. यातून त्यांनी यापुढं अश्लील नृत्यांच्या कार्यक्रमांना थारा दिला जाणार नसल्याचा इशाराच दिला आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे. त्यापूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी (ता. ८) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लावणीच्या नावाखाली होणाऱ्या अश्लिल नृत्यांच्या कार्यक्रमांवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
याबाबत वेळ पडली तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मांडू, असा इशारा दिला. तसेच असे कार्यक्रम आयोजन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनाही सूचना केल्या आहेत. राष्ट्रवादीच्या (NCP) कोणत्याही पदाधिकाऱ्याने अश्लिल नृत्यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करणे मान्य नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “महाराष्ट्राची एक उच्च परंपरा आहे. पहिल्यापासून आपल्या वडिलधाऱ्यांनी एक परंपरा निर्माण केली आहे. ती परंपरा टिकली पाहिजे. मात्र काही ठिकाणी लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्याचे प्रकार घडतात. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारं आहे. त्यामुळे कोणी चुकीचं वागत असेल, तर त्याला पायबंद घातला पाहिजे. तो विषय मी अर्थसंकल्पात मांडेन,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं आहे.
यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनाही इशारा दिला आहे. ते म्हणाले अनेक ठिकाणी अशा नृत्यांच्या कार्यक्रमांना राष्ट्रवादीचे फलक लावले जातात. हे आम्हाला अजिबात मान्य असे सांगत कार्यक्रमांचे आयोजन न करण्याच्या सूचनाही पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
अजित पवार म्हणाले, "महाराष्ट्रातील लावणीची परंपरा टिकली पाहिजे. आपल्या इथं चालणारे लावणीचे कार्यक्रम कुटुंबांतील सर्वांना पाहता येतील, असेच असावेत. त्यात अश्लील प्रकार व्हायला नकोत. काही जिल्ह्यांमध्ये अशा कार्यक्रमांना बंदी आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ते चालू आहे. वस्तूस्थितीबाबत संबंधितांशी बोलणार आहे. तसंच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन करू नये."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.