Live Update 2 Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update : पुणे हादरलं! चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; मुख्यमंत्र्यांवर सुषमा अंधारे संतापल्या...

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 2 May महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) प्रशासकीय, आर्थिक, शैक्षणिक तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

सरकारनामा ब्युरो

Pune Bhor Crime news : पुणे हादरलं! चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; मुख्यमंत्र्यांवर सुषमा अंधारे संतापल्या...

पुण्यातील भोर परिसरामध्ये एका चार वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या केली. भोर तालुक्यातील नसरापूर येथे हा प्रकार घडला. ही अल्पवयीन मुलगी नसरापूरला तिच्या आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आली होती. त्यावेळी एका नराधमाने तिला जवळच असलेल्या गुरांच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करुन तिची हत्या केली. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. गृहमंत्र्यांना या गोष्टींचा काही फरकच पडत नाही, त्यांना देणेघेणं नाही. काही झालं तरी गृहमंत्री राजीनामा देणार नाहीत. ते दूरच राहिलं, मोठं भाषण करणे, आम्ही प्रकरणाचा मुळाशी जाऊ म्हणणे, या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाहीत. ज्याचं पोट जळालं, त्याला झळ लागली, आपण एका असुरक्षित राज्यात आहोत, याचं भान आपल्याला असलं पाहिजे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

Satara News : साताऱ्यातील 67 वर्षांच्या जाधवांनी डोंगर पोखरून तयार केला रस्ता...

साताऱ्याजवळील श्री सिलोबा गड येथे पूर्वी खडतर, घसरडा आणि अरूंद, अशी पायवाट होती. मात्र आता हा रस्ता स्वच्छ, सपाट आणि चालण्यायोग्य झाला आहे. करंडी गावचे 67 वर्षाचे अशोक जाधव यांनी ना कुठलाही स्वार्थ ना प्रसिद्धीची अपेक् न ठेवता, आपल्या ग्रामदैवत सिलोबाप्रती श्रद्धा आणि स्वतःचा फिटनेस, यातून हा 3.5 किलोटरचा रस्ता बनवला आहे. गेल्या एका वर्षांत सुमारे साडेतीन किलोमीटरचा, रस्ता या डोंगरात श्रमदानातून तयार केला आहे.

Beed Update : परळीत सोमवारी मांसविक्री बंदीचा निर्णय; वैद्यनाथ नगरीत भाविकांसाठी नगरपरिषदेचं मोठं पाऊल

बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या भावना लक्षात घेवून दर सोमवारी मांस विक्री बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय परळी नगरपालिकेने घेतला आहे. असा निर्णय घेणारी परळी नगरपालिका पहिली पालिका ठरली आहे. नगरपालिकेच्या स्थायी समितीने एकमताने हा ठराव मंजूर केला. नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Mumbai News : मिसिंग लिंकवर पहिल्याच दिवशी ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच

मुंबई-पुणे अंतर कमी करणाऱ्या मिसिंग प्रकल्पात तब्बल 8.87 किमी लांबीच्या बोगद्यात एखादा अपघात घडून वाहतूक विस्कळीत होऊ नये, यासाठी सुरुवातीला अवजड वाहने आणि ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, हा मार्ग सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी त्यावरून ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणारे टँकर धावत असल्याचे चित्र समोर आले आहे.

Raigad Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर सकाळपासून वाहनांच्या रांगा, तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी कायम

रायगड जिल्ह्यातील वाहतूक कोंडीची परिस्थिती कायम असून, मुंबई-गोवा महामार्गावर सकाळपासून वाहनांच्या रांगा आहेत. काल दिवसभर आणि आज सकाळपासून नागोठणे माणगाव, इंदापूर शहराजवळ वाहनांच्या रांगा आहे. सलग तीन दिवस सुट्टयांमुळे मोठ्या प्रमाणात मुंबईकर कोकणवासीय आणि पर्यटक कोकणाच्या दिशेने यायला निघाल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील पेट्रोल पंपावर देखील वाहनांची मोठी गर्दी.

Buldhana News : बुलढाण्यातली 729 गावे टंचाईग्रस्त घोषित; 18 गावात टँकर मंजूर, तर 59 गावात विहिरी अधिग्रहीत

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील 729 गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली असून 18 गावात टँकर मंजूर, तर 59 गावात विहिरी अधिग्रहीत करण्यात आली आहेत. जिल्ह्याचा जून पर्यंतचा पिण्याच्या पाण्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Ahilyanagar Crime : मुलाने केली बापाची हत्या, कौटुंबिक वादाची किनार

श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरातील धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून मुलाने बापाची हत्या केली. रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. मुलाने बापावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 65 वर्षीय मुसा हसन बागवान यांचा मृत्यू झाला. मुलगा आशपाक बागवान (वय 30) याला पोलिसांनी अटक केली आहे.

HSC Result 2026 : बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज 2 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाइन हा निकाल पाहता येणार आहे. परीक्षेसाठी 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील 7 लाख 99 हजार 773 विद्यार्थी विज्ञान शाखेचे, 3 लाख 80 हजार 692 कला शाखेचे तर 3 लाख 20 हजार 152 विद्यार्थी वाणिज्य शाखेचे होते. शिवाय 27 हजार 378 विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी तर 4 हजार 492 विद्यार्थी आयटीआय शाखेचे होते. बारावीची ही परीक्षा एकूण 9 विभागांमध्ये घेण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT