Maharashtra Bandh
Maharashtra Bandh Sarkarnama
महाराष्ट्र

`महाराष्ट्र बंद`वरून व्यापारी नाराज : मुंबई, नागपुरात विरोध; पुण्यात पाठिंबा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे सरकार उद्या (११ ऑक्टोबर) रस्त्यावर उतरणार आहे. या `बंद`ला पाठिंबा मिळविण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी तयारी केली आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांनी या `बंद`ला पाठिंबा दिला असला तरी मुंबई आणि नागपुरातील व्यापाऱ्यांनी `बंद`च्या विरोधात भूूमिका घेतली आहे.

भाजपने या बंदच्या विरोधात जाहीरपणे मत व्यक्त केले आहे. तसेच हा बंद अनाठायी असल्याचे मत व्यक्त केले. दुसरीकडे मनसेनेही या बंदला विरोध करत यामागचे तर्क काय, असा सवाल उपस्थित केला आहे.

मनसेच्या व्यापारी सेनेचे यशवंत किल्लेदार यांनी म्हटले आहे की लखीममपूर खेरी येथे घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. परंतु महाराष्ट्रात सरकारमधीलच पक्षांनीच महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे यामागे नेमके कोणते लॉजिक आहे कळत नाही. आधीच करोनामुळे गेले दीड- दोन वर्षे व्यापारी आर्थिक संकटात आहे. आता कुठे काही प्रमाणात सर्व सुरळीत होतंय त्यात असे बंद व्यापाऱ्यांना परवडणारे नाहीत आणि निषेध करायचंय तर अन्य मार्ग आहेत त्याचा अवलंब करावा बंदच का? सरकारच बंद करणार असेल तर गाऱ्हाणं मांडायच तरी कोणाकडे ? या बंदमध्ये सामिल न होता व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपली दुकाने चालु ठेवावीत.

दुसरीकडे मुंबईतील व्यापाऱ्यांनीही आम्हाला व्यवसाय शांततेत करू द्या, अशी मागणी केली आहे. गेल्या 18 महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे आणि आता व्यवसाय हळूहळू वाढू लागला आहे. नवरात्रोत्सवाच्या / दिवाळीच्या सणांच्या मध्यभागी जिथे ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत त्यामुळे आम्हाला आपला व्यवसाय शांततेने करू द्या. . किरकोळ व्यवसाय चालू ठेवण्यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो. आम्हाला आशा आहे की दुकानदारांना त्रास देऊ नये किंवा त्यांना बंद राहण्यास भाग पाडू नये, असे आवाहन फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे वीरेन शाह यांनी केले आहे.

नागपूरमधील व्यापाऱ्यांनीही यात सहभाग होण्यास असहमती दर्शवली आहे. नियमित व्यापार सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. तो बंद करणे शक्य नाही.आता सणासुदीचे दिवस आहे. त्यामुळे व्यापार बंद ठेवता येणार नाही. ज्यांना स्वतः हुन बंद ठेवायचा ते ठेऊ शकतात. मात्र कोणी जबरदस्तीने व्यापार बंद करू नये. पोलिसांनी व्यापाऱ्यांना सहकार्य करावे, अशी भूमिका नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी मांडली.

पुण्यातील व्यापाऱ्यांचा पाठिंबा

पुणे व्यापारी फेडरेशनची या बंदबाबत बैठक झाली. त्यात सर्वानुमते सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे ठरले आहे. आपली असोसिएशन पण त्यात सहभागी आहे. याची सर्व सभासदांनी नोंद घेऊन उद्या 3 नंतर दुकाने उघडावित, असे आवाहन पदाधिकारी

किसान सभेचा महाराष्ट्र बंदला सक्रिय पाठिंबा !

संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या अखिल भारतीय शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाचा समावेश असणाऱ्या वाहन ताफ्याने चिरडून मारले. सबंध देशभर जनतेमध्ये या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. विविध पक्ष व संघटनांनी महाराष्ट्रामध्ये या घटनेचा निषेध करण्यासाठी 11 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्या वतीने अजित नवले यांनी या बंदला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.

किसान सभेच्या सर्व शाखा महाराष्ट्र बंद मध्ये अत्यंत सक्रियपणाने सहभागी होत आहेत. किसान सभेचे काम आलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये गाव, शहर, तालुका व जिल्ह्यामध्ये 'बंद' यशस्वी करण्यासाठी सर्व समविचारी पक्ष व संघटनांच्या तातडीने बैठका घेऊन बंदचे नियोजन करण्याचे आवाहन किसान सभेने आपल्या शाखांना केले आहे.जनतेने या बंदमध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभेने केले आहे.

सुरु राहू दे तुमचं राजकारण, बंद नको चित्रीकरण : मनसे

लखीमपूर येथील दुर्दैवी दुर्घटना,शेतकरी आंदोलन याबद्दल आम्हाला नक्कीच सहानुभूती आहे. पण त्यासाठी ‘महाराष्ट्र बंद’चा हाक देणाऱ्या महाविकास आघाडीला विनंती आहे की ११ ऑक्टोबरला चित्रपट,वाहिन्यांवरील मालिका यांचे चित्रीकरण सुरु ठेवावेत. लॉकडाउन काळात चित्रपट,नाटक व संबंधीत तंत्रज्ञ, कामगार यांनी बंद मुळे बरंच भोगलंय. आता पुन्हा एक दिवस काम बंद ठेवलं तर आर्थिक नुकसान सोसावं लागेल. म्हणूनच पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये चित्रीकरण थांबवू नयेत ही तमाम चित्रपट इंडस्ट्रीतर्फे आम्ही मागणी करत आहोत. शासनाने या क्षेत्राचा गांभिर्याने विचार करावा, असे अमेय खोपकर (उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सेना) यांनी कऴविले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT