Tukaram Mundhe FDA Action News Sarkarnama
महाराष्ट्र

Tukaram Mundhe News: पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढेंचा दणका! 3 दिवसांत 53 छापे, 25 FIR, 33 जण तुरुंगात

Tukaram Mundhe FDA Action News: FDA आयुक्तपद स्वीकारताच तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये आले. राज्यभरात 53 छापे, 25 FIR, 33 अटक आणि लाखोंचा भेसळयुक्त माल जप्त करून प्रशासनाला हादरा दिला.

Mangesh Mahale

FDA Action Maharashtra : अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच तुकाराम मुंढे यांनी पुन्हा एकदा आपल्या कडक प्रशासकीय शैलीची झलक महाराष्ट्राला दाखवून दिली आहे. शिस्तप्रिय आणि निर्णयक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मुंढेंनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत राज्यभरात अशी धडक मोहीम उभी केली की, भेसळखोर, गुटखा विक्रेते आणि नियम मोडणाऱ्या आस्थापनांमध्ये अक्षरशः खळबळ उडाली.

25 मे रोजी आयुक्तपद स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला होता की नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. त्यांच्या आदेशानंतर FDA यंत्रणा तात्काळ मैदानात उतरली आणि मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण तसेच छत्रपती संभाजीनगर विभागात एकाच वेळी विशेष छापा सत्र सुरू करण्यात आले

27 आस्थापनांना सील

या मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी संशयित आस्थापनांवर अचानक छापे टाकले. गुटखा, पानमसाला आणि इतर प्रतिबंधित पदार्थांची खुलेआम विक्री करणाऱ्या अनेक दुकानांचा पर्दाफाश झाला. अवघ्या तीन दिवसांत 53 ठिकाणी छापे टाकण्यात आले. तर 34 आस्थापनांमध्ये बंदी असलेला माल सापडला. या प्रकरणी 25 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. 33 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गुटखा वाहतूक करणारी पाच वाहने जप्त करण्यात आली, तर 27 आस्थापनांना थेट सील ठोकण्यात आले.

प्रशासनाचा हातोडा

मुंबई विभागात सर्वाधिक मोठी कारवाई झाली. येथे 19 आस्थापनांवर छापा टाकून सर्व ठिकाणे सील करण्यात आली. प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि दिशाभूल करणाऱ्या पॅकिंगवर प्रशासनाने थेट हातोडा चालवला. या संपूर्ण कारवाईत 20 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

28 लाखांचा साठा जप्त

फक्त गुटखाच नव्हे, तर नागरिकांच्या रोजच्या वापरातील अन्नपदार्थांवरही FDA ने लक्ष केंद्रित केले. दूध, पनीर, तूप, मसाले, खवा, बेसन, पॅकबंद पाणी, फरसाण, आईसक्रीम आणि बेकरी पदार्थांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत सुमारे 28 लाख रुपयांहून अधिक किमतीचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला.

कडक प्रशासन

तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच दाखवलेली ही आक्रमक कार्यपद्धती पाहता, FDA मध्ये पुन्हा एकदा ‘कडक प्रशासन’ परतल्याची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे. त्यांच्या या दणक्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT