Tukaram Mundhe: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकूळ) नुकतीच निवडणूक झाली, यामध्ये महायुतीच्या पॅनलचा पराभव झाला तर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनं दमदार विजय मिळवला. महाराष्ट्रात तर या निवडणुकीची भरपूर चर्चा झालीच पण केंद्रीय पातळीवरही याचे पडसाद उमटले. पण या निवडणुकीचे निकाल हा सध्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा प्रभाव असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. याच चर्चेवर आज खुद्द तुकाराम मुंढे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
तुकाराम मुंढे यांच्याकडं राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार होता, तेव्हा त्यांनी कोल्हापुरातील बोगस दूध सोसायट्यांवर केलेल्या कारवाईचा यंदाच्या निवडणुकीवर प्रभाव पडल्याची चर्चा सुरु होती. यावर साम टीव्ही न्यूजच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' या मुलाखतीच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर स्पष्टीकरण देताना मुंढे म्हणाले, "या विभागात काम करत असताना दुध सोसायट्यांचं ऑडिटचं काम माझ्या कार्यक्षेत्रात येतं होतं. त्यामुळं राज्यातील सर्वच दूध सोसायट्यांचं ऑडिट करायचं काम आम्ही हाती घेतलं.
मी जेव्हा या विभागात रुजू झालो तेव्हा जवळपास २७ हजार दूध सोसायट्या कागदोपत्री अस्तित्वात होत्या. नियमानुसार, त्या दूध सोसायट्या असल्यानं तिथं दुधाचं संकलन व्हायला हवं. पण तसं होत नसल्यानं १५ हजार दूध सोसायट्या मी रद्द केल्या होत्या. कारण या सोसायट्या केवळ कागदोपत्रीच होत्या, तिथं दुधाचं संकलन केलं जात नव्हतं किंवा तिथं तेवढे शेतकरी नव्हते कारण त्यांच्याकडं तितकी जनावरं नव्हती"
"या १५ हजारांपैकी सुमारे ५ हजार दूध सोसायट्या या एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून रद्द करण्यात आल्या होत्या. हा आकडा या जिल्ह्यातील सर्वाधिक होता कारण कोल्हापुरात सर्वाधिक दूध सोसायट्या आहेत. त्यामुळं यातील खऱ्या किती खोट्या किती हा माझ्यासमोर प्रश्न होता, त्यामुळं आम्ही त्यांचं ऑडिट केल्यानंतर ५ हजार सोसायट्या रद्द केल्या होत्या. त्यानंतर पुढे हे प्रकरण हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टातही गेलं होतं. कोर्टानंही साधारण १,४०० सोसायट्या वगळून उर्वरित सर्व रद्द करण्यायोग्य होत्या यावर शिक्कामोर्तब केलं होतं.
पण या दूध सोसायट्या रद्द केल्यामुळं नुकत्याच गोकुळच्या झालेल्या निवडणुकीत कोणाला फायदा झाला की तोटा झाला? हे मला माहिती नाही. त्यामुळं या निवडणुकीला मी कारणीभूत असू शकत नाही. त्यामुळं माझा या निवडणुकीशी संबंध नाही" असं स्पष्टीकरण यावेळी तुकाराम मुंढे यांनी दिलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.