IAS Tukaram Mundhe viral post: Sarkarnama
महाराष्ट्र

Tukaram Mundhe: शिवाजी जन्माला यावा, पण शेजारी!’ तुकाराम मुंढेंनी समाजाच्या मानसिकतेवरच बोट ठेवलं; पोस्ट व्हायरल

IAS Tukaram Mundhe viral post: ‘बदल व्हायला हवा’ असे म्हणणारे अनेकजण आहेत; परंतु तो बदल घडवण्याची जबाबदारी स्वतः घेण्याऐवजी दुसऱ्याने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा केली जाते. ‘शिवाजी जन्माला यावा, पण शेजारी’ या मानसिकतेवरही त्यांनी प्रहार केला.

Mangesh Mahale

Tukaram Mundhe latest news: प्रशासनातील धडाकेबाज आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले आहेत.

समाजात अन्याय होत असताना त्याकडे केवळ प्रेक्षक म्हणून पाहणाऱ्या मानसिकतेवर मुंढे यांनी आपल्या पोस्टमधून परखड भाष्य केले आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची आणि योग्य वेळी कृती करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचा संदेश त्यांनी दिला आहे.

आपल्या भूमिकेसाठी मुंढे यांनी महाभारतातील हस्तिनापूरच्या दरबाराचे उदाहरण दिले आहे. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगाचा दाखला देताना त्यांनी हा प्रश्न केवळ दुर्योधनापुरता मर्यादित नव्हता, तर सभेत उपस्थित असलेल्या प्रत्येक प्रभावशाली व्यक्तीशी संबंधित होता, असे म्हटले आहे. भीष्मांसारख्या व्यक्तीकडे मूल्यांची कमतरता नव्हती; मात्र निर्णायक क्षणी कृती करण्याची कमतरता होती, असा मुद्दा त्यांनी मांडला.

आजच्या काळात परिस्थिती बदलली असली तरी मानसिकता फारशी बदललेली नाही, असेही मुंढे यांनी सूचित केले. सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ, पोस्ट किंवा ग्रुप चॅट हजारो लोक पाहतात; मात्र प्रचंड संख्येने प्रेक्षक असताना अन्यायाविरोधात प्रत्यक्ष भूमिका घेण्याची वैयक्तिक जबाबदारी कमी होत जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटिझन्सकडून त्यावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.

‘बदल व्हायला हवा’ असे म्हणणारे अनेकजण आहेत; परंतु तो बदल घडवण्याची जबाबदारी स्वतः घेण्याऐवजी दुसऱ्याने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा केली जाते. ‘शिवाजी जन्माला यावा, पण शेजारी’ या मानसिकतेवरही त्यांनी प्रहार केला. समाजात परिवर्तन घडवण्यासाठी दुसऱ्या एखाद्या महान व्यक्तीची प्रतीक्षा करण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार योग्य वेळी आवाज उठवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंढे यांच्या मते, मौनाचीही किंमत मोजावी लागते. धैर्य अचानक निर्माण होत नाही आणि जबाबदारी स्वीकारण्याची तयारी स्वतःमध्ये निर्माण करावी लागते.** अन्याय घडत असताना तो थांबवण्यासाठी पुढाकार घेणे हेच खरे नेतृत्व असल्याचा संदेश त्यांनी दिला.

महाभारत कोणत्याही चमत्कारामुळे नव्हे, तर कुरुक्षेत्रावरील संघर्षानंतर संपले, असे सांगत त्यांनी आजच्या समाजातही कोणीतरी चमत्कार करेल, अशी अपेक्षा न ठेवता प्रत्येकाने आपल्या वाट्याची भूमिका बजावावी, असे आवाहन केले आहे. त्यांच्या या पोस्टला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, नेटिझन्समध्येही त्यावर चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT