Maharashtra Social News: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी येथे आयोजित मौन श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यानचा एक कथित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील युवकांसंदर्भातील वक्तव्याहून विविध पातळीवर रोष व्यक्त होत असून मोठा वाद निर्माण झाला आहे.
देशातील तरुणांच्या आंदोलनांना ‘अराजकता पसरवणारी’ आंदोलने असल्याचे कथित स्वरूपात संबोधण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुदेव सेवा मंडळाकडून यासंदर्भात अद्याप काहीच स्पष्टीकरण आलेले नसून संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतरही प्रतिसाद मिळू शकलेला नाही.
मौन श्रद्धांजली कार्यक्रमात सर्वधर्म प्रार्थनेपूर्वी एका निवेदनाचे वाचन महेश तिवारी यांच्याकडून करण्यात आले असून त्यामधील कथिक वक्तव्याहून वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने अनेकांनी रोष व्यक्त केला आहे.
या कथित व्हायरल व्हिडिओमध्ये देशात सुरू असलेली युवकांची आंदोलने हिंसक असून, युवकांची माथी भडकावून अराजकता पसरवली जात असल्याचे म्हटले असल्याचा दावा करण्यात आला आहे. या वक्तव्यावर अनेक तरुणांनी आक्षेप घेत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरही तरुणांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची युवकांच्या आंदोलनाबाबतची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचे म्हणत गुरुदेव सेवा मंडळाविरोधात मोठा रोष व्यक्त होत आहे.
दरम्यान, ‘सकाळ’ माध्यम समूह या व्हिडिओची पुष्टी करीत नाही. यासंदर्भात गुरुदेव सेवा मंडळाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अद्याप त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
गुरुकुंज मोझरीचे ग्रामगीता प्रचारक रवी मानव म्हणाले, "राष्ट्रसंतांनी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाला स्वतंत्र, व्यापक, विवेकनिष्ठ आणि मानवतावादी वैचारिक वारसा दिला आहे. मात्र, आज संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांची भूमिका पाहता ते गुरुदेव सेवा मंडळाच्या स्वतंत्र विचारपरंपरेपेक्षा विशिष्ट राजकीय पक्षाच्या विचारसरणीशी अधिक बांधील असल्याचे जाणवते. ही बाब चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत केवळ पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही".
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यावर म्हणाले, "वंदनीय तुकडोजी महाराजांनी त्यांच्या ‘लहर की बरखा’ या पुस्तकातून युवकांच्या आंदोलनाला समर्थनच केले आहे. त्यांनी कधीही युवकांना आणि त्यांच्या आंदोलनाला कमी लेखले नाही. मग, मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातून सर्वधर्मसमभावाच्या शिकवणीचा संदेश द्यायचा असताना, त्याच ठिकाणाहून देशातील युवकांना ‘अराजक’ संबोधले जाते. स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या युवकांना अराजक म्हणणे हा त्यांचा अपमान आहे".
माजी आमदार अमोल मिटकरी या वादावर म्हणाले की, "मतभेद असू शकतात, मात्र अशा पवित्र व्यासपीठावरून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याचे भान राखणे आवश्यक होते. सामान्य गुरुदेव सेवकांचा श्रद्धेचा आदर राखून झालेल्या प्रकाराचा मी तीव्र निषेध करतो".
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.