Mahavikas Aaghadi.jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Maharastra Politics: उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्यानं अखेर मोठा बॉम्ब टाकलाच; राजकीय वारं फिरणार, शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार..?

Mahavikas Aaghadi News: महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, फौजिया खान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील, भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार हे 2 एप्रिल 2026 रोजी निवृत्त होत आहेत. ते राज्यसभा पुन्हा लढवणार की थांबणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. शरद पवारांसाठी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत सध्या महायुतीचं संख्याबळ सर्वाधिक आहे.त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि एकनाथ शिंदेंच्या महायुतीचं पारडं जड मानलं जात आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशा तीनही पक्षांसह महाविकास आघाडीकडे असलेल्या संख्याबळाच्या आधारावर ते राज्यसभेची केवळ एकच जागा निवडून आणू शकतात असे चित्र आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता.14) पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी राज्यसभेची एक जागा महाविकास आघाडी निवडून आणणार असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती देतानाच महाविकास आघाडीत या निर्णयावर चर्चा सुरू असल्याचं स्पष्ट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी माझी आणि आदरणीय शरद पवार यांची सविस्तर भेट झाली होती. त्यावेळी मी त्यांना आगामी राज्यसभा निवडणुकीबाबत आणि त्यांच्या भूमिकेबाबत विचारणा केल्याचंही सांगितलं.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, यावेळी शरद पवारांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले की, ते ही निवडणूक पुन्हा लढवण्यास इच्छुक आहेत आणि राज्यसभेसाठी ते पुन्हा मैदानात उतरणार आहेत. पवारांच्या या निर्णयामुळे त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी मविआकडून शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाणार असल्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस हे शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबत अनुकूल असल्याचे संकेतही आहे. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील असे व्यक्तिमत्व आहेत, ज्यांना साठ वर्षांहून अधिक काळ संसदीय कामकाजाचा अनुभव आहे. अशा अनुभवी नेत्याची सभागृहाला गरज आहे. पवारांनी आपली ही इच्छा केवळ आम्हालाच नाही, तर काँग्रेस पक्षाच्या धुरिणांनाही कळवल्याचं राऊत यांनी म्हटलं. तसेच पवारांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीची ताकद संसदेत कायम राहणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, फौजिया खान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील, भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे चार तर भाजप आणि आठवले मिळून तीन खासदार आहेत. या सर्व खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे.

विधानसभेच्या 2024 मधील निवडणुकीतील निकालानंतर भाजपकडे 131, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 57, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 असं महायुतीचं एकूण संख्याबळ 228 आमदार आहेत. महायुती अपक्षांच्या पाठिंब्यासह राज्यसभेवर सहा खासदार निवडून जाऊ शकतात. त्यात भाजप चार, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT