Nashik News : नाशिक शहरातील गंगापूर रोड भागातील अडीच एकर शैक्षणिक भूखंडावरील आरक्षण बेकायदेशीररित्या बदलले जात असल्याने या प्रक्रियेला स्थगिती देऊन सदर घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी. सेवाजेष्ठता डावलून बेकायदेशीरपणे केलेल्या बदल्यांची चौकशी करून सदर बदल्या रद्द करण्यात याव्यात अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
नाशिक महानगरपालिकेतील मागील भूसंपादन घोटाळ्याची चौकशी सुरू असताना आता जवळपास 200 कोटींच्या बेकायदेशीरपणे भूसंपादनाचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या संदर्भातील 30 टक्के रक्कम पाठवण्याची कार्यवाही सूरु आहे. सदर भूसंपादन करतांना उच्च न्यायालयाचे आदेश आहेत तसेच 12 टक्के मासिक व्याज दराने सुरू आहे असे कारण दिले जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करणे गरजेचे आहे. यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी अपील केले नाही. आता अपिलाची मुदत संपली असे कारण दिले जात आहे. मात्र महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय चुकीमुळे जर महापालिकेला आर्थिक फटका बसत असेल तर सर्व प्रकरण एकत्र करून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे आवश्यक आहे. तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भूसंपादनासाठी रकमा पाठवल्या जाऊ नये, अशी मागणी भुजबळांनी(Chhagan Bhujbal) मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
नाशिक महानगरपालिकेमध्ये(Nashik Municipal Corporation) मागील काळात मिसिंग लिंक भूसंपादन घोटाळा झालेला आहे. मिसिंग लिंक म्हणजे एखाद्या रस्त्याची दोन्ही बाजूने जागा संपादित झाली आहे मात्र मध्येच एखादा पॅच बाकी आहे अशा जागेचे भूसंपादन, मिसिंग लिंकची संपूर्ण यादी राज्य शासनाकडे मागवून शासनाच्या पूर्व मान्यतेनंतरच भूसंपादनाची कार्यवाही होणे आवश्यक आहे.
काही भूसंपादनांमध्ये जमीन मालकांनी आपले अधिकार अन्य व्यक्तीला दिलेले असतात. अशा प्रकरणांमध्ये मूळ मालकालाच मोबदला दिला जावा अशी तरतूद आहे. मात्र या तरतुदीकडे दुर्लक्ष केले जाते. विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शासनाची बदनामी होणार नाही याबाबत दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याने नाशिक शहरातील बेकायदेशीरपणे केली जात असलेली भूसंपादन प्रक्रिया स्थगित करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
नाशिक शहरातील गंगापूर रोडवर भागातील चोपडा हॉस्पिटललगत सर्व्हे क्रमांक 717 भूखंडावर शैक्षणिक आरक्षण आहे. या शैक्षणिक प्रयोजन व लोकहितासाठी अडीच एकर क्षेत्रफळ असलेल्या आरक्षित भूखंडावरील मूळ आरक्षण रद्द न करण्यासाठी हरकती मागवण्यात आल्या आहेत. 119 कोटी रुपयांचा हा भूखंड असून मूळ शैक्षणिक आरक्षण हटवून त्यावर रहिवासी आरक्षण निश्चित केले जात आहे. मुळात ही जागा पुढील दहा वर्षासाठी महापालिकेच्या ताब्यात असणार आहे.त्या आधीच शैक्षणिक झोन रद्द करणे बेकायदेशीर असून त्यामुळे महानगरपालिकेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान सुध्दा होणार आहे.
जोपर्यंत ते आरक्षण व्यपगत होत नाही तोपर्यंत त्यावरील झोन वा त्याचे मूळ प्रयोजन बदलता येत नाही. मात्र काही लोकप्रतिनिधींनी केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने बेकायदेशीरपणे हे शैक्षणिक आरक्षण बदलले जात आहे. अशा पद्धतीने दहा वर्षाची मुदत संपण्यापूर्वी आरक्षण व त्याचे झोन बदलले जाऊ लागले तर चुकीचे पांयडे पडतील. तसेच महापालिकेचे मोक्याचे रिझर्वेशन हातातून जातील त्यामुळे सदर बेकायदेशीर आरक्षण बदलाला स्थगिती देऊन सदर घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
त्याचबरोबर नाशिक महानगर पालिकेत सेवाजेष्ठता डावलून बेकायदेशीरपणे बदल्या करण्यात आल्याबाबत तक्रार आहे. नगररचना कार्यकारी अभियंता पदी संजय अग्रवाल यांच्या ऐवजी प्रशांत पगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये मोठे अर्थकारण झाल्याबाबत तक्रारी आहेत. पगार हे कनिष्ठ अधिकारी असून त्यांच्याकडे नगररचना विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाची जबाबदारी कशी दिली गेली असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणे महानगर विकास प्राधिकरणांमधून त्यांना नाशिकमध्ये अवघ्या दोन महिन्यापूर्वी आणले गेले व त्यानंतर त्यांना एकाच महिन्यामध्ये दोन मोठ्या पदांची जबाबदारी देण्यात असल्याचे म्हटले आहे.
तसेच समीर रकटे हे कनिष्ठ अभियंता असताना नियमबाह्यपणे त्यांच्याकडे नगररचना तसेच बांधकाम विभाग उपअभियंता पदाचा पदभार दिला आहे. आता आचारसंहितेपूर्वी अंतर्गत फेरबदल म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये बदल्या केल्या जात असून नगररचना व बांधकाममध्ये नियुक्ती देण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार आहे.
यापूर्वीच्या विभागामध्ये काम केले असेल त्या विभागामध्ये पुन्हा नियुक्ती देऊ नये असे असताना बांधकाम व नगररचना या विभागामध्ये यापूर्वी काम केलेल्या अनेक अधिकाऱ्यांना पुन्हा त्याच विभागात बदली देण्यात आली आहे. त्यामुळे सेवाजेष्ठता डावलून बेकायदेशीरपणे केलेल्या बदल्यांची चौकशी करून सदर बदल्या रद्द करण्यात याव्या अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.