Satyajit Tambe News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Satyajeet Tambe : ''प्रिय ददू, फक्त पुन्हा हरवू नकोस'' ; सत्यजीत तांबेंच्या आई दुर्गा तांबेंनी लिहिलं पत्र!

Letter of Durga Tambe : जाणून घ्या, नेमकं असं का म्हणाल्या आहेत दुर्गा तांबे आणि 'तेव्हा' असं काय घडलं होतं?

Pradeep Pendhare

Nagpur Winter Session : नाशिक पदवीधरचे आमदार सत्याजीत तांबे हे सध्या नागपूर हिवाळी अधिवेशनात, राज्यभरातील पदवीधरांसह तरुणांशी संबंधित विविध समस्या आणि प्रश्न मांडताना दिसत आहे.

अभ्यासपूर्ण मांडणीमुळे सहकारी आणि ज्येष्ठांकडून त्यांचे कौतुक होत असतानाच आमदार सत्यजीत तांबे(Satyajeet Tambe) यांच्या आई दुर्गा सुधीर तांबे यांनी देखील त्यांचे जाहीरपणे कौतुक केले आहे. त्यांनी यासाठी एक पत्रच लिहिले आहे. ज्यामध्ये सत्यजीत तांबे यांच्या लहानपणाशी निगडीत असलेल्या नागपूरमधील एका आठवणीला उजाळा दिला आहे.

दूर्गा तांबे यांनी सत्यजीत तांबे यांना लिहिलेलं पत्र जसं ज्या तसं -

प्रिय ददू, अनेक आशीर्वाद !

''या वर्षी तू आमदार झालास तेव्हापासून सतत कामानिमित्त दौऱ्यांवर किंवा फिरतीवर असतोस. या आधी तुला कधी पत्र लिहावं असं वाटलं नाही. पण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी यंदा तू पहिल्यांदाच आमदार म्हणून गेलास आणि मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या. विधान परिषदेतली तुझी कामगिरी आम्ही बघत आहोत. लोकांच्या मनाला भिडणारे अनेक प्रश्न तू सभागृहात मांडत आहेस. तुझ्या अभ्यासपूर्ण मांडणीचं कौतुक वाटतं. ''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

''पण आजचं हे पत्र त्याबद्दल नाही. तू नागपूरला गेल्यापासून एक प्रसंग मला राहून राहून आठवतोय. कदाचित तुला आज त्याची आठवण नसेल. तू फक्त ६-७ वर्षांचा होतास. खूप वर्षं लोटली त्या गोष्टीला. ९०च्या विधानसभा निवडणूकीत आबा (बाळासाहेब थोरात) दुसऱ्यांदा आमदार झाले. नागपूरच्या अधिवेशनाला जाताना त्या वर्षी त्यांनी आम्हा सर्व भावंडांना आणि बच्चे कंपनीनाही सोबत घेतलं होतं.''

''डिसेंबर महिन्यात नागपूरमध्ये थंडीचा कडाका खूप असतो. त्या वेळी तर थंडी जास्तच असायची. त्यामुळे आम्ही सगळे दुकानात स्वेटर खरेदी करायला गेलो. तू देखील होतास. अगदी लहान! आपण सगळे गाडीनेच गेलो होतो. शांताराम मामा गाडी चालवत होते. आपण गाडी धरमपेठच्या एका चौकात उभी केली आणि दोन रस्ते ओलांडून एका दुकानात खरेदीसाठी गेलो होतो.''

...तर तुझा पत्ताच नाही, मग झालं! -

''तुझी आजी म्हणजे माझी आई, आपण सगळेच तिला बाई म्हणायचो. तर, बाईने आम्हाला सूचना केलीच होती की, मुलांचं बोट सोडायचं नाही, त्यांना नीट सांभाळायचं. तुम्ही मुलांनी स्मिता मावशी आणि साधना मावशीचा हात धरला होता. स्वेटर बघायला म्हणून आम्ही दुकानाच्या तळघरात गेलो. तू एक पुतळा बघत उभा राहिलास आणि मावशीचा हात सुटला. आम्ही वर आलो, तर तुझा पत्ताच नाही. मग झालं ! सगळी शोधाशोध सुरू झाली.

आम्हाला दरदरून घाम फुटला होता -

''इकडे-तिकडे दोन-तीन दुकानं शोधूनही तू मिळेना, म्हटल्यावर आम्ही सगळेच घाबरलो. त्या थंडीतही घाम फुटला होता आम्हाला. जवळपास अर्धा तास आम्ही येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला विचारत होतो, 'लाल शर्ट आणि जिन्सची निळी हाफपँट घातलेला मुलगा पाहिला का?' पण त्या शहराच्या गर्दीत कोणीच सांगत नव्हतं. आता मात्र आम्हाला दरदरून घाम फुटला होता. शेवटी आम्ही ठरवलं की, आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायची.''

आम्ही सगळेच थक्क झालो होतो -

''सगळेच जण कसेबसे चिंतातूर चेहऱ्याने गाडीजवळ आलो आणि बघतो तर काय, तिथे तू शांताराम मामाच्या कडेवर बसला होतास. त्या वेळी तुला बघून झालेला आनंद मी आजही विसरू शकत नाही. मला आठवतं, एकीकडे मी रडत होते आणि त्याच वेळी तुला बघून हसत होते. शांताराम मामाच्या कडेवरून तू माझ्याकडे उडी मारली. तू गाडीपर्यंत कसा पोहोचलास, हे तुला विचारलं आणि तू दिलेलं उत्तर ऐकून आम्ही सगळेच थक्क झालो होतो.

''मेरे आबा आमदार है, हम अधिवेशन को आए है'' -

''अजूनही तुझे शब्द आठवतात. तू म्हणालास, 'तुम्ही कुठे गेलात, ते मला कळे ना. मी घाबरून तुम्हाला इकडे तिकडे शोधत होतो. बाजूला बंगाली मिठाईचं दुकान होतं. त्यांना विचारलं की, आमची मम्मी-आबा कुठे आहेत. पण त्यांना मराठी समजेना. मग मी पुढल्या दुकानात गेलो. मी हिंदीतून विचारलं की, मेरे आबा आमदार है, हम अधिवेशन को आए है, वो कहाँ गए? त्यांना मी सांगितलं की, आमची गाडी दोन रस्ते सोडून लावली आहे. ते माझ्यासोबत गाडीपर्यंत आले. शांताराम मामा दिसल्यावर मला रडायलाच आलं.''

''आज हे सगळं आठवताना मला पुन्हा एकदा भरून आलंय. त्या वेळी तू एवढा छोटा होतास आणि तरीही तोडक्या मोडक्या हिंदीत बोललास. गाडी कुठे पार्क केली होती, तेदेखील त्यांना बरोबर दाखवलं होतंस. आम्हाला तुझ्या हुशारीचं कौतुक वाटलं होतं. आता तू स्वत: आमदार म्हणून नागपूर हिवाळी अधिवेशनाला गेलास, फक्त हरवू नकोस म्हणजे झालं.''

तुझी मम्मी, सौ. दुर्गा

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT