Karjat-Jamkhed Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Shinde Vs Rohit Pawar: 'खर्ड्या'त रोहित पवारांना पुन्हा धक्का; ग्रामपंचायतीत दोन सदस्य फुटल्याने उपसरपंचपद राम शिंदेंच्या गटाकडे

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News: कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना गेल्या दोन महिन्यात चौथ्यांदा राजकीय धक्का बसला आहे. तर भाजपचे विधानपरिषद आमदार राम शिंदेंनी सलग चार वेळेस बाजी मारत रोहित पवारांना धोबीपछाड दिली आहे.

जामखेड तालुक्यातील खर्डा गाव मोठ्या लोकसंख्येचे आणि मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. येथील ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी मतदारसंघाच्या सर्वच नेत्यांचा नेहमी प्रयत्न असतो. मात्र, खर्डा ग्रामपंचायतीत 17 पैकी 10 सदस्यांचे बहुमत असताना आणि भाजपकडे 7 सदस्य असताना महिनाभरापूर्वी सरपंचपद निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचा एक सदस्य फोडत 9 विरुद्ध 8 असा विजय मिळवत रोहित पवारांना पहिला धक्का दिला होता.

यानंतर गेल्या महिन्यात जामखेड आणि कर्जत बाजार समिती निवडणुकीतही आमदार पवारांना जिंकण्यासारखी परस्थिती आणि बहुमत असताना दोन्ही ठिकाणी पदाधिकारी निवडणुकीत जामखेड बाजार समितीमध्ये ईश्वर चिठ्ठीत नशिबाची साथ मिळाल्याने तर कर्जत बाजार समितीत सदस्य फुटल्याने आमदार राम शिंदे गटाचे उमेदवार सभापतीपदी निवडून आले.

आता आज (10 जुलै) खर्डा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीतही रोहित पवार गटाचे 9 मधील दोन ग्रामपंचायत सदस्य फुटले आणि याही वेळी पराभवाचा पाढा कायम राहत राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव जमकावळे यांचा पराभव झाला.

आमदार शिंदे गटाच्या शीतल सुग्रीव भोसले यांना 10 मते मिळवत उपसरपंचपदी निवडून आल्या. त्यामुळे आमदार पवार यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या महिना-दोन महिन्यातील निवडणुकांत राष्ट्रवादी पक्ष जिंकत असला तरी पदाधिकारी निवडणुकीत सदस्य फुटीचे ग्रहण सातत्याने मागे लागल्याने पराभवाचा फटका आमदार रोहित पवारांना बसताना दिसून येत आहे.

2009 आणि 2014 या दोन्ही विधानसभा निवडणुका भाजपचे राम शिंदे यांनी आरामात जिंकल्या होत्या. 2014 च्या विजयानंतर युती सरकारमध्ये राम शिंदे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री तर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून एन्ट्री झाली आणि त्यांनी चुरशीच्या झालेल्या लक्षवेधी निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत राम शिंदेंचा धक्कादायक पराभव केला.

या निकालाने दुखावलेले राम शिंदेंना गेल्या वर्षी भाजपने विधानपरिषदेवर संधी दिली. विधानपरिषदेत संधी मिळाल्यानंतर आमदार राम शिंदे यांनी पुन्हा कर्जत-जामखेड मतदारसंघात जोरदार लक्ष घालत राष्ट्रवादीकडे गेलेले अनेक जुने मोहरे आपल्याकडे वळवले आहेत.

खर्डा गटात राष्ट्रवादी पक्षाला आघाडी असताना आणि ग्रामपंचयत निवडणुकीत हार पत्करावी लागली तरी पहिल्यांदा सरपंच आणि आता उपसरपंचपद निवडणुकीत विरोधी गटातील काही सदस्य गळाला लावत आपल्याकडे खेचल्याने बहुमत असतानाही राष्ट्रवादीला आणि पर्यायाने रोहित पवार यांना मात दिली आहे.

सततच्या चार पदाधिकारी निवडणुकांत पराभव होत असल्याने हे निवडणुकांचे निकाल रोहित पवार यांना सूचक इशारा देणारे तर राम शिंदे यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी उत्साह वाढवणारे असतील.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT