Ahmednagar News, 26 Sep : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाची गुरुवारी (ता.26 सप्टेंबर) शिवस्वराज्य यात्रा नगर शहरामध्ये येत आहे. याचवेळी पक्षातील गटबाजी समोर आली आहे. पक्षातील दोन नेत्यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन यात्रेच्या नियोजनाची माहिती दिली.
पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते डॉ. अनिल आठरे तसेच माजी महापौर संदीप कोतकर यांच्या महाविकास आघाडीतील संभाव्य उमेदवारीच्या चर्चेबाबत भाष्य करणं टाळलं आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी दहा वाजता नंदनवन लॉन्समध्ये शिवस्वराज्य यात्रा होणार आहे. याची माहिती देण्यासाठी माजी महापौर कळमकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कार्याध्यक्ष नामदेव पवार, विधानसभा अध्यक्ष नीलेश मालपाणी उपस्थित होते.
माजी महापौर कोतकर यांच्या संभाव्य महाविकास आघाडीकडील उमेदवारीबाबत बोलताना कळमकर म्हणाले, "कोतकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याचे ऐकण्यात आलेलं नाही व कुठे वाचलंही नाही. शिवाय महाविकास आघाडी अंतर्गत तीन पक्षांच्या इच्छुकांची एकत्रित बैठक ज्येष्ठ नेते दादा कळमकर व प्रा. शशिकांत गाडे यांनी घेतली असून ज्याला उमेदवारी मिळेल, त्याचे सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्या बाहेरील विषय आमच्यासमोर नाही. ते विषय पक्षश्रेष्ठींच्या स्तरावर निर्णयाचे असतात."
अभिषेक कळमकर यांनी यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला. ही विधानसभा निवडणूक साधी सोपी नसून चुरशीच होणार आहे. आमच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे, ते म्हणजे विद्यमान आमदाराची चुकीची विचारधारा, दहा वर्षे नगरकरांना झालेला त्रास, खालच्या पातळीवर सुरू असलेले राजकारण, शहराचा खंडित झालेल्या विकास. खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार हे सारे हाणून पाडण्याचा आमचा मुख्य उद्देश असल्याचं ते यावेळी म्हणाले.
या यात्रेची माहिती देण्याचा अधिकार डॉ. आठरे यांना आहे का? ते शहर कार्यकारिणीत पदाधिकारी आहेत का? असे सवाल कळमकर यांना केले असता, डॉ. आठरे पदाधिकारी नाहीत. मात्र, पक्षात ज्येष्ठ नेते आहेत.
त्यांना यात्रेविषयी अधिकची माहिती पत्रकारांना द्यावयाची असेल म्हणून त्यांनी पत्रकार परिषद बोलावली असेल, त्यामुळे त्याबाबत तुम्ही त्यांनाच विचारा, असे कळमकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान शिवस्वराज्य यात्रनिमित्ताने डॉ. आठरे आणि कळमकर यांचा स्वतंत्रपणे माध्यमांशी संवाद म्हणजे संभाव्य उमेदवारी बाबतची कुरघोडी असल्याची चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.