Ahilyanagr News : भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या होम ग्राऊंडवर महाविकास आघाडीत गोंधळल्याचे वातावरण आहे. राहाता नगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवारांनी फाॅर्म भरताना, पक्षाचे चार 'एबी' फाॅर्म चोरून घेतले, त्याचा वापर उमेदवारी अर्ज भरला गेला. ज्यांनी हा प्रकार केला आहे, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. परंतु, हा प्रकार संबंधित अधिकाऱ्यांना कळवून देखील त्यांचे अर्ज वैध ठरवण्यात आल्याचा आरोप, खासदार अनिल देसाई यांनी केला. दरम्यान, पक्षाकडून झालेल्या कारवाईवर, त्यासोबतच या सर्व प्रकारावर राहाता येथील माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे आणि शिवसैनिकांनी पत्रकार परिषद घेत, झालेल्या अन्यायावर भाष्य केले. पण हे करताना, भावनिक बांध फुटला अन् घडलेला सर्व प्रकार सांगितला.
खासदार अनिल देसाई यांनी, राहाता नगरपरिषदेच्या निवडणुकीत गैरप्रकार झाला आहे. निवडणूक प्रक्रियेत विसंगती, परिपत्रकात अचानक बदल आणि फसवणुकीच्या चार नामांकानाबाबत, तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसैनिकांनी एबी फाॅर्म चोरल्याचे अन् त्यावरून झालेल्या हकालपट्टीवर राहातामधील स्थानिक नेते तथा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. यावेळी त्यांच्याबरोबर, ज्या शिवसैनिकांनी उमेदवारी अर्ज भरला, 'एबी' फाॅर्म वापरला, ते देखील उपस्थित होते. माजी नगरसेवक सागर लुटे, तिसऱ्या उमेदवार उज्ज्वला होले यांचे प्रतिनिधी आणि भागवंत लांडगे उपस्थित होते.
राजेंद्र पठारे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली, "राहता नगरपालिकेसाठी महाविकास आघाडीची तयारी सुरू होती. याबाबत आम्ही देखील तयारी करत होतो, मंत्री विखे पाटील यांना शह देण्यासाठी आमचे संपूर्ण तयारी होती. परंतु काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या मतदारसंघात हस्तक्षेप केला. आम्ही मागणी केली होती की, नगरपालिकेची निवडणूक 'मशाल' चिन्हावर लढावे म्हणून. थोरातसाहेबांचा नेमका इंटरेस्ट काय होता आणि त्यांनी चिन्ह घेण्यास काय म्हणून नकार दिला हे अजूनपर्यंत कळले नाही. थोरात यांनी विश्वासात घेतले नाही. ही शिवसेना आम्ही काँग्रेसने होऊ देणार नाही, त्यांना त्यांच्या कानाखालचे लोक हवे आहेत," असा गंभीर आरोप केला.
शिवसेना 'केटी' झाली
'कोपरगाव येथे अमित शहा यांची सभा झाली. त्या कार्यक्रमाला राहता येथील शहर प्रमुखांनी हजेरी लावली, ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्याच कार्यक्रमाला हजेरी लावली. एक प्रकारे उद्धवसाहेबांची ही फसवणूक आहे. येथे आम्हाला, शिवसेना पदाधिकाऱ्यांना डिवचले जाते की, येथील शिवसेना 'केटी' झाली आहे, म्हणजेच येथील शिवसेना (Shivsena) कोल्हे-थोरात चालवतात, हे आम्हाला अजिबात मंजूर नाही. याठिकाणी निष्ठावान शिवसैनिकांना डावलले जात आहे. आम्ही ते कदापि सहन करणार नाही', असेही राजेंद्र पठारे म्हणाले.
पक्षाने आम्हाला 'एबी' फॉर्म दिला
'पक्षाने आम्हाला 'एबी' फॉर्म दिला, त्यानंतर आम्ही उमेदवारी दाखल केली. यानंतर थोरातसाहेब किंवा इतर कोणी काय जादू केली माहित नाही, आज सकाळी कळले की आमची पक्षातून हकालपट्टी झाली. 'मशाल' चिन्ह बदलायचे कारण काय? आमचा प्रश्न आहे थोरात यांना येथील शिवसेना संपवायचे आहे का? ही आम्हाला शंका आहे आणि आम्ही ते होऊ देणार नाही,' असे राजेंद्र पठारे म्हणाले.
'माझं घर जाळले गेले, तरी मी पक्ष सोडला नाही. दहा रुपयाला महाग झालो, मुलांना वाऱ्यावर सोडले आणि पक्षाने माझी ही किंमत केली का? हे फळ दिले का? याठिकाणी पक्ष जिवंत ठेवण्यासाठी आम्ही धडपडतोय, असे म्हणत राजेंद्र पठारे यांचा भावनिक बांध फुटला. ते भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले. याचवेळी शिवसैनिक भागवत लांडगे हे देखील भावनिक झाले अन् त्यांनी रडतच आपली भूमिका मांडली.
अनिल राठोडांची आठवण
'उद्धव साहेब कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देत नाहीत. परंतु खालचे जे पुढारी आहेत, त्यांचे अनेक लागेबांधे आहेत, यातून हे आमच्याबरोबर राजकारण केले जात आहे, पक्षासाठी युवा पोरांनी तडीपारी सहन केल्या, घरदार सोडलं, आत पक्ष चिन्हं जिवंत ठेवण्यासाठी धडपडतोय, यात काय आमची चूक आहे का?'असा सवाल केला. त्यासोबतच 'एकनाथ शिंदे यांचे आमचे घरगुती संबंध होते. आम्ही त्यांच्याबरोबर गेलो नाही, तरी त्यांनी आमचे काम केले. आम्ही उद्धव साहेबांबरोबर थांबण्याचा निर्णय घेतला. कारण की, शिवसेना हे आमचे घर आहे. पण आता आम्हाला पश्चाताप होत आहे. घर जाळले गेले होते , त्यावेळी अरविंद सावंत, दिवंगत नेते अनिल राठोड यांनी खूप मदत केल्याची आठवण सांगून, एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी आम्हाला पक्षाच्या कामात खूप मदत केली. कामं मार्गी लावली,' याची आठवण देखील राजेंद्र पठारे यांनी सांगितली.
थोरात वचपा काढत आहेत
'बाळासाहेब थोरात कृषिमंत्री असताना आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांच्या घरावर कांदे फेक आंदोलन केले होते. त्याचा वचपा आता काढला जात आहे, त्यामुळे उद्धव साहेबांना एकच सांगणे आहे, साहेब तुम्ही खूप चांगले आहात, प्रामाणिक आहात, शिवसैनिकांवर खूप प्रेम आहेत. परंतु खालचे पुढारी मात्र शिवसेना अडचणीत आणत आहेत. त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन माहिती घेतली पाहिजे. आम्ही फकीरच आहोत. कारण की, आम्ही शिर्डीतले लोक आहोत. आमचे साई देखील फकीरच होते. त्यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही, आमची एकच विनंती आहे की, शिवसेना काँग्रेसमय होऊ नये,' असे राजेंद्र पठारे म्हणाले.
पठारेंचा 'एबी' फॉर्मबाबत मोठा खुलासा
'आम्हाला पक्षाचा 'एबी' फॉर्म हा पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. परंतु आम्ही त्यांचे नाव सांगू शकत नाही. त्यांनाही पक्ष जिवंत ठेवण्यासाठी त्यांची तळमळ आहे. या सगळ्यामध्ये काही नेते आहेत, त्यांचे आम्ही पक्ष हितासाठी नाव घेऊ शकत नाही, उमेदवारी दाखल केलेली आहे. आम्ही निवडणूक लढवणारच आहोत, पक्षाची काय भूमिका आहे ते नंतर पाहून घेऊ. अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी आहे. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढचा निर्णय घेऊ. परंतु या प्रकारामुळे खूप मनस्ताप झाला आहे. थांबून पण घेऊ शकतो, आम्ही पक्षासाठी त्याग केला आणि त्याच पक्षाने आमची हकालपट्टी केली. मग उमेदवारी करण्याबाबत काय मजा आहे का?' असा सवाल करत राजेंद्र पठारे यांनी उमेदवार करण्याबाबत सांशकता व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.