धुळे : महापालिकेच्या (Dhule) अंदाजपत्रकात तरतुदी केल्या जातात. प्रत्यक्षात पाठपुरावा करून, चकरा मारूनही कामे होत नाहीत. प्रशासनाकडून निव्वळ टाइमपास व त्यातून भाजपला (BJP) बदनाम करण्याचे काम सुरू आहे, असा गंभीर आरोप स्थायी समितीत सत्ताधारी भाजपचे नेते नागसेन बोरसे (Nagsen Borase) यांनी केला.
या आरोपांच्या अनुषंगाने तुम्ही रोज कुणाशी बोलता याचे पुरावे देऊ का, असे आव्हानच एका सदस्याने आयुक्तांना दिले. एकहाती सत्ता असताना, तीन वर्षांपासून चर्चा आणि इशारेच दिले जात असल्याची टीका विरोधी सदस्याने सत्ताधारी भाजपवर केली.
महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक ऑनलाइन सभा गुरुवारी सकाळी अकराला महापालिका सभागृहात झाली. सभापती शीतल नवले, आयुक्त देवीदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ, काही सदस्य सभागृहात, तर काही ऑनलाइन उपस्थित होते. सदस्य हर्षकुमार रेलन यांनी मलेरियाचे पर्यायी काम ‘एलबीटी’च्या तक्रारी, पाणीपुरवठ्याचे नियोजन, बजेट मंजुरीबाबत प्रश्न विचारले. त्यावर सभापती श्री. नवले यांनी नागरिकांना पाणी पाजण्यासारखा दुसरा आनंद नाही. येत्या काळात निश्चितच सकारात्मक परिणाम दिसेल, असे सांगितले. मलेरियाचे कामही कमी खर्चात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
२०१९ पासून चकरा
२०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ अशा सलग तीन आर्थिक वर्षांतील प्रभागातील कामांसाठी मी महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहे. अभियंता कैलास शिंदे यांच्याकडे १०० वेळा गेलो. मात्र, एकाही कामाची ऑर्डर निघत नाही. आता लोक विचारतात ‘कुठे गेले तुमचे २० कोटी, पाच कोटी’, अशा संतप्त भावना श्री. रेलन यांनी व्यक्त करत जाब विचारला.
थेट आयुक्तांनाच आव्हान
पूर्वी आठ दिवसांत कामांच्या निविदा निघायच्या, आता चार-चार महिने ही प्रक्रिया होत नाही. प्रशासनाकडून निव्वळ टाइमपास सुरू आहे. भाजपला बदनाम करण्याचे काम सुरू आहे, असा आरोप सदस्य नागसेन बोरसे यांनी केला. याच विषयाच्या अनुषंगाने त्यांनी आपण रोज कुणाशी बोलता याचे पुरावे देऊ का, असे थेट आव्हानच आयुक्त टेकाळे यांना दिले. श्री. टेकाळे यांनीही त्याला उत्तर दिल्याने श्री. बोरसे यांनी तुमचे आव्हान स्वीकारत असल्याचे सांगितले. वार्षिक लेखे मंजुरी, २०२०-२१ चे सुधारित व २०२१-२२ चे मूळ अंदाजपत्रक मंजुरीच्या अनुषंगानेही श्री. बोरसे यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
हद्दवाढीचे दुखणे कायम
सदस्य नरेंद्र चौधरी यांनी हद्दवाढ क्षेत्राच्या विकासासाठी ३५० कोटींच्या प्रस्तावाचे काय झाले, असा प्रश्न केला. त्यावर अभियंता शिंदे यांनी शासनाकडून निधी मिळाला नसल्याचे सांगितले. किरण अहिरराव यांनी प्रभागातील सुरत बायपासजवळील १८ कॉलन्यांमध्ये जलवाहिनीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी केली. दरम्यान, समितीने रस्ते, संरक्षक भिंत, ब्लिचिंग पावडर खरेदी खर्च आदी विषय मंजूर केले.
साबीर शेठ यांचा निशाणा
महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असताना, तीन वर्षांपासून केवळ चर्चा आणि अधिकाऱ्यांना इशारे देणे सुरू आहे. अंमलबजावणी कुठेच दिसत नाही. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने असलेल्या या सभागृहात असा प्रकार होतो, असा चिमटा काढत काँग्रेसचे सदस्य साबीर शेठ यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. नाजियाबानो पठाण यांनी प्रभागातील नाल्याला संरक्षक भिंतीच्या मागणीसह साफसफाई होत नसल्याची तक्रार केली.
---------
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.