Nitin Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics: लोकसभेसाठी ठाकरेंचे ‘वेट ॲण्ड वॉच’; योग्य पक्षाची वाट पाहण्याची ‘एमव्हीपी’ सरचिटणीसांची रणनीती

सरकारनामा ब्यूरो

अरविंद जाधव :

Nashik News: लोकसभेसाठी तयार आहे. मात्र, योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ, असे नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांना योग्य असेल त्या पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास आनंदच आहे, असे सांगत त्यांनी सर्व पक्षांचे दरवाजे उघडे असल्याचे अप्रत्यक्ष स्पष्ट केले.

मराठा विद्या प्रसारक संस्था राज्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेपैकी एक आहे. अगदी तळागाळापर्यंत संस्थेची मुळे असून, जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव सुद्धा आहे. सध्याचे आणि यापूर्वीच्या खासदार व आमदारांच्या विजयाचे गणित संस्थेच्या माध्यमातून पुढे सरकत आल्याचे आजवर दिसून आले आहे. संस्थेत दिर्घ लढाई दिल्यानंतर ॲड.ठाकरे यांच्यासह पॅनेलचा भुतो ना भविष्य असा विजय झाला. त्यांचे मजबूत वर्चस्व संस्थेवर निर्माण झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता त्यांचे लक्ष लोकसभा आहे. सध्या जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गरम आहे. भुजबळांविरोधात ताकद उभी करण्याचे स्पष्ट संकेत सकल मराठा समाजाच्या बैठकींमध्ये वारंवार देण्यात आले आहे. दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षांसाठी उमेदवारांची निवड करताना कौशल्य पणाला लागणार आहे. एकतर जागा कोणत्या पक्षाला सुटेल हे स्पष्ट नाही. त्यातच भाजपाकडून सर्वाधिक इच्छुक आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीतील उभी फुट यामुळे सर्व पक्षीय उमेदवार चित्र स्पष्ट होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. ॲड.ठाकरे सुद्धा त्याच पंक्तीत आहेत.

'राऊतांना भेटलो नाही अन् पवारांच्या भेटी होत असतात'

दरम्यान, ठाकरे शिवसेनेसोबत जातील की राष्ट्रवादीबरोबर याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. याबाबत ठाकरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, संस्थेच्या कामानिमित्त शरद पवारांना काही दिवसांपूर्वी भेटलो होतो. या भेटी सतत होतात. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट झाल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात नाकारले.

अद्याप त्याची लोकसभा निवडणूक म्हणून कधीही भेट झाले नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून कदापी लढवणार नाही. योग्य वेळी योग्य पक्ष आणि कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन पुढील रणनीती आखली जाईल, एवढे सांगतो, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT