Adv. Ujjwal Nikam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Adv. Ujjwal Nikam News : निकम यांनी उलगडले रहस्य... कसाब कोणाला 'बादशहा' म्हणायचा?

अॅड. उज्ज्वल निकम म्हणाले, राजकीय पदांवर नेमणुकीला निवृत्त न्यायाधिशांनी स्वतः विरोध केला पाहिजे.

Sampat Devgire

Adv. Ujjwal Nikam : निवृत्त न्यायाधिशांची कुठल्याही राजकीय हेतूने प्रेरित पदांवर नेमणूक व्हायला नको. सरकार अथवा राजकीय पक्षांनी तसा प्रस्ताव दिला तरी, न्यायाधिशांनी स्वत:हून त्याला विरोध केला पाहिजे. व्यवस्थेत पारदर्शीपणा असावा. सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढविण्यासाठी त्याची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. (Adv. Ujjwal Nikam`s interview in publisher Gathering at Nashik)

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विद्यमाने आयोजित चौथ्या लेखक, प्रकाशक साहित्य संमेलनात रविवारी अॅड. निकम यांची प्रकट मुलाखत झाली. स्वागताध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी अॅड. निकम यांनी मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्याचा अनुभव सांगताना जिवंत पकडलेला अजमल कसाब मला 'बादशहा' म्हणून हाक मारायचा असे सांगितले.

यावेळी अॅड. निकम यांनी आपला जीवनप्रवास उलगडताना माझ्या आईला वाटत होते की मी डॉक्टर व्हावे आणि वडीलांना वाटे की, वकील व्हावे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी दोन गुण कमी पडले म्हणून वकील होण्याचा निर्णय घेतला. मराठी माध्यमाच्या शाळेत आणि विज्ञान शाखेचा विद्यार्थी असतानाही मराठीतील ऐतिहासिक कादंबऱ्या वाचनाची मला आवड आहे. महाविद्यालयीन जीवनात कविता लिहिण्याचा छंद लागला, पण त्या कधी प्रसिध्द केल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, गाजलेल्या खटल्यांपैकी मुंबई दहशतवादी हल्यातील अजमल कसाब या दहशतवाद्याला फाशी, अबु सालेमला जन्मठेप या खटल्यांचा घटनाक्रम त्यांनी सांगितला. कोल्हापूर न्यायालयाने बालगुन्हेगार असलेल्या रेणुका व सीमा गावित यांना फाशीची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाच्या बाहेर काही लहान मुले साखर वाटत असल्याचा आनंद आजही स्मरणात असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वसामान्य व्यक्तींचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले, सर्वसामान्य व्यक्तिंना चर्चेतून, बातम्यांतून किंवा त्यांना दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींतून माहिती मिळते. त्यातून ते आपले मत तयार करतात. स्वत:चे स्वतंत्र विचार मांडत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींचा न्यायवस्थेवरील विश्वास कमी होत असल्यास ही निश्चितच धोक्याची घंटा आहे.

न्यायवस्थेने कामकाजात अधिक पारदर्शकता आणावी. त्यासाठी निवृत्त न्यायाधिशांच्या राजकीय हेतूने प्रेरीत पदांवर नेमणूका व्हायला नको. अशा नेमणूका होत असल्यामुळेच न्यायव्यवस्थेविरुध्द प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. रॅपिड फायरच्या माध्यमातून विश्वास ठाकूर यांनी अॅड. निकम यांच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली.

राजकारणात येण्याची विचार नाही

राज्यातील सध्याची अस्थिर राजकीय परिस्थिती आणि घडामोडींमुळे राजकारणात येण्याबाबत कुठलाही विचार केलेला नाही. राज्यातील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल, असे भाविकीतही त्यांनी वर्तवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT