BJP minister Radhakrishna Vikhe Patil : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेवरून अहिल्यानगरचं राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आमदार सत्यजीत तांबे यांनी, पुणे-अहिल्यानगर-नाशिक इथल्या सर्वपक्षीय नेत्यांना बरोबर घेत, लढा उभारण्याच्या तयारीत आहेत. यातच भाजपचे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात होता.
मंत्री विखे पाटील यांनी आपली भूमिका मांडताना, 'चिंता करू नका, नाशिक-पुणे रेल्वे देवठाण (ता. अकोले) मार्गे नेण्यासाठी पालकमंत्री म्हणून शब्द आहे,' असे म्हटले आहे. माजी आमदार वैभव पिचड यांच्या उपस्थित हा शब्द देताना मंत्री विखे पाटलांनी संगमनेर तालुक्याचा उल्लेख खुबीनं टाळला. त्यामुळे मंत्री विखे पाटलांची भूमिका रेल्वे कोणत्या मार्गानं व्हावी, याबाबत संशयकल्लोळाचीच असल्याची चर्चा संगमनेरमध्ये आहे.
अकोले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या देवठाण इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळा खोल्याचं उद्घाटन, विद्यार्थ्यांना डिजिटल बोर्डचं वितरण मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थित झालं. यानंतर त्यांनी नाशिक (Nashik)-पुणे रेल्वेचा बदलेल्या मार्गावरून भाषणात भाष्य केले. ते म्हणाले, "2019 साली तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदल कोणी केलाॽ हे सुध्दा जनतेला कळू द्या."
रेल्वे पळविल्याचा आरोप करणाऱ्यांना सुनावताना, मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe) म्हणाले, "स्वत:ची अकार्यक्षमता लपविण्यासाठी रेल्वेच्या प्रश्नावरून काहींनी शिट्या वाजवायला सुरूवात केली आहे. मात्र यांचा भोंगा जनता वाजवल्याशिवाय राहाणार नाही." सध्या कोण कोणत्या रेल्वेच्या डब्यात बसले आणि कोणत्या डब्याला कोणाचे इंजिन जोडले गेले, समजायला तयार नाही, असा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
'पाणी आणि रेल्वेच्या संदर्भात होत असलेल्या आरोपावर विखे पाटील यांनी, पाणी पळवायला आम्ही तर, खूप लांब आहोत. मध्ये कोण आहेत हे आधी तपासा. रेल्वेच्या बाबतीत सुध्दा देवठाणहून जाणारा प्रस्तावित मार्ग 2021 साली महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणी बदलला हे सुध्दा पाहा. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोण मंत्री होते. 2019 मध्ये तयार केलेला प्रस्तावित मार्ग कोणी बदलला या प्रश्नाचे उत्तर सुध्दा मिळाले पाहिजे,' असे म्हणत मंत्री विखे यांनी बाळासाहेब थोरातांचे नाव न घेता निशाणा साधला.
'केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना पत्र देवून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही निर्णय न करण्याची तसेच बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून जनतेच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविणार असून 2019 साली देवठाणसह नाशिक-पुणे रेल्वेच्या प्रस्तावाचा निर्णय कायम ठेवण्यासाठी माझा प्रयत्न असेल,' असे मंत्री विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले.
वैभराव पिचड यांनी रेल्वेच्या विषयांवरून विरोधकावर टिका केली. ते म्हणाले, "दिवंगत नेते मधुकरराव पिचड यांनी तत्कालीन मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे देवठाणहून रेल्वे नेण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. मात्र सध्याच्या आमदारांना आपली रेल्वे गेल्याचे समजले सुध्दा नाही." महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रस्तावात कोणी बदल केला, त्यावेळी कोण मंत्री होते, हे सर्वांना माहिती आहे. कोणतेही विकास काम सध्याच्या लोकप्रतिनिधींना करता आले नाही, असा टोला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.