Ahilyanagar BJP MLA felicitation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jayant Patil : भाच्यानंतर आता मामा? जयंत पाटलांवर भाजपच्या कार्यक्रमात रंगली जोरदार चर्चा

Political taunts dominate Ahilyanagar BJP MLA felicitation event as Jayant Patil and Prajakt Tanpure become center of discussion : अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपच्या नवनियुक्त आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात सर्वाधिक चर्चा रंगली ती, शरद पवार राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि त्यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांच्याभोवती!

Pradeep Pendhare

Ahilyanagar BJP Event Sparks Political Buzz : अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपच्या नवनियुक्त आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात केवळ अभिनंदनाचा माहोल नव्हता, तर नेत्यांमधील राजकीय टोलेबाजीमुळे कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला.

या संपूर्ण कार्यक्रमात सर्वाधिक चर्चा रंगली ती, शरद पवार राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि त्यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांच्याभोवती!

विधान परिषदेवर नियुक्त झालेल्या भाजप (BJP) आमदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, प्राजक्त तनपुरे आणि विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले अक्षय कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

कार्यक्रमात एकाच पक्षातील तसेच काही कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी नेते एकाच मंचावर आल्याने वातावरण आधीपासूनच उत्सुकतेचे होते. मात्र चर्चेचा केंद्रबिंदू ठरले ते प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) आणि त्यांचे मामा जयंत पाटील! आमदार प्राजक्त तनपुरे हे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीपासून सातत्याने चर्चेत आहेत. कार्यक्रमात त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी सत्कार स्वीकारल्यानंतर लगेच कार्यक्रमातून बाहेर पडल्याची माहिती समोर आली.

याच मुद्द्यावर भाष्य करत प्रा. राम शिंदे यांनी मिश्कील टिप्पणी केली. तनपुरे अजूनही भाजपमध्ये थोडे अवघडलेले दिसतात. कारण त्यांचे मामा अजून दुसऱ्या पक्षात म्हणजे शरद पवार राष्ट्रवादीत आहेत, असे म्हणत त्यांनी वातावरण हलके केले. राम शिंदे यांच्या या वक्तव्यावर भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी लगेचच टोला लगावला. त्यांच्या मामांनाही आपल्याकडे घ्या, असे म्हणत त्यांनी राजकीय चर्चेला नवे वळण दिले.

जयंत पाटलांची जबाबदारी विखेंवर

यानंतर राम शिंदे यांनी चेंडू थेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कोर्टात टाकला. यावर विखे पाटील बोलतील, प्रत्येकाने काम वाटून घेतलं तर ताण कमी होतो, अशी टिप्पणी करताच सभागृहात एकच हशा पिकला. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली.

विवेक कोल्हेंचं सुजय विखेंवर उपरोधिक पलटवार

काही दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांनी विवेक कोल्हे यांचे नाव न घेता, आम्ही नाकारलेले पद तुम्हाला मिळाले, पदाचा आनंद घ्या पण माज करू नका, असा टोला लगावला होता. याला प्रत्युत्तर देताना विवेक कोल्हे यांनीही उपरोधिक शैलीत पलटवार केला. तुमच्या त्यागामुळे आम्हाला संधी मिळाली, त्यासाठी अभिनंदन! असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला. विवेक कोल्हे यांनी राजकीय टोलेबाजीसोबतच विकासाच्या मुद्द्यावरही लक्ष वेधले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अहिल्यानगर-मनमाड रस्त्याचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सर्व पक्षांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्याची गरज व्यक्त केली.

काँग्रेस डबक, तर भाजप प्रवाही

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवनिर्वाचित आमदारांना शुभेच्छा देताना लोकाभिमुख काम करण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवरच नाराजी व्यक्त करत सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात भाजप कार्यकर्ते कमी पडत आहेत, अशी खंत व्यक्त केली. दरम्यान, सुनील कर्जतकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, काँग्रेसच्या काळात अहिल्यानगर जिल्ह्यात नेतृत्वाची डबकी तयार झाली होती. मात्र भाजपने नेतृत्व प्रवाही ठेवले, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT