NCP MP controversy : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
'पराभव झाला तरी मागच्या एका वर्षात मी जेवढं काम केलं, त्याच्या दोन टक्के सुद्धा काम आजच्या खासदाराने केलं नाही,' असा टोला विखे पाटलांनी खासदार लंकेंना लगावला. तसंच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना नगर शहरातच होईल. दुसरीकडे नेण्याचा प्रश्नच नाही, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर इथल्या अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब युनिटचा लोकार्पण कार्यक्रम माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. जिल्हा शल्यचिकित्सक संजय गोगरे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिलराव मोहिते आदी उपस्थित होते.
सुजय विखे पाटील म्हणाले, “मागच्या एका वर्षात मी जेवढं काम केलं, त्याच्या दोन टक्के सुद्धा काम आजच्या खासदाराने केलं नाही. माझा पराभव झाला, पण मी जनतेसाठी थांबलो नाही. जनतेला काही लोकांच्या भरोशावर सोडणं योग्य नाही. आम्ही थांबलो असतो तर जिल्ह्याचा विकासच थांबला असता."
'मतदान (Voter) ही लोकशाहीची ताकद आहे. चुकीचा माणूस निवडला तर आपल्या मुलांचं भविष्य धोक्यात येईल. विकास करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभं राहा. हा संघर्ष सत्तेसाठी नाही, तर तुमच्या भवितव्यासाठी आहे,' असेही विखे पाटील यांनी म्हटले.
'तसंच अहिल्यानगर शहरात 511 एकर मध्ये एमआयडीसी उभारण्याचा आमचा निर्धार आहे. जमीन दिली आहे. सातबाऱ्यावर बोजा चढवला आहे. न्यायालयीन अडथळे असूनही पुढील सहा महिन्यांत एमआयडीसी सुरू होईल,' अशा विश्वासही सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
वैद्यकीय महाविद्यालयाबाबत सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना अहिल्यानगर शहरातच होईल. दुसरीकडे नेण्याचा प्रश्नच नाही. हा शब्द मी राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्यावतीने देतो."
सुजय विखे पाटील यांनी, 'आगामी काही दिवसांत आम्ही दहा कोटी रुपयांच्या खर्चाने महिला प्रशिक्षण केंद्र उभारणार आहोत. या केंद्रात शहरी आणि ग्रामीण महिलांना बचत गटांमार्फत रोजगार प्रशिक्षण दिलं जाईल, जेणेकरून त्या स्वावलंबी बनतील,' असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.