Sangram Jagtap Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vikhe Thorat ADCC Bank seat sharing : अहिल्यानगर जिल्हा बँकेचा आज फैसला; 7 जागांवर विखे-थोरातांचा तिढा, जगतापांची भूमिका निर्णायक?

Vikhe-Thorat seat-sharing deadlock puts seven key seats at the centre of Ahilyanagar DCC Bank election talks : अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस; सर्वसाधारण मतदारसंघातील सात जागांच्या वाटपावर महायुती-महाविकास आघाडीत रस्सीखेच, सचिन जगतापांच्या उमेदवारीचीही चर्चा

Pradeep Pendhare

Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे चित्र आज (5 ऑक्टोबर) अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सोसायटी मतदारसंघातील जागावाटपावर तुलनेने सहमतीचे प्रयत्न सुरू असले, तरी सर्वसाधारण मतदारसंघातील सात जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये सुरू असलेला तिढा कायम आहे. विखे पाटील आणि थोरात गटाकडून सातपैकी प्रत्येकी चार जागांवर दावा केला जात असल्याने अंतिम तोडगा कसा निघणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँक (DCC Bank) निवडणुकीच्या जागावाटपाच्या समीकरणात अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. आपले बंधू सचिन जगताप यांच्यासाठी त्यांनी ताकद लावल्याची चर्चा असून, बिगरशेती मतदारसंघातून सचिन जगताप यांना संधी मिळावी यासाठी महायुतीच्या पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या वेळी सहमतीचे राजकारण करताना दत्तात्रय पानसरे यांची समजूत काढण्यात आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांचा विधान परिषदेचा मार्ग सुकर झाला होता. त्याचवेळी संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप आणि त्यांचे कट्टर समर्थक व माजी उपमहापौर गणेश भोसले यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. आमदार जगताप यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याची नाराजीही कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली होती.

महायुतीच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या वेळी जगताप यांनी केलेल्या शिष्टाईची परतफेड आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांच्या बंधूला उमेदवारी देऊन होणार का, हा प्रश्न चर्चेत आहे. त्यामुळे सचिन जगताप यांच्यासाठी संग्राम जगताप महायुतीत नेमकी किती ताकद लावतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विखे-थोरात गटात सात जागांवर रस्सीखेच

जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण मतदारसंघातील सात जागांवर विखे पाटील आणि थोरात गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गटांकडून सातपैकी चार जागांवर दावा केला जात असल्याची चर्चा आहे. याशिवाय सभापती राम शिंदे यांच्यासाठी एक जागा राखून ठेवण्याची मागणी असल्याने जागावाटपाचे गणित आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. त्यामुळे दोन्ही गटांच्या दाव्यांमध्ये तडजोड कशी साधली जाते, हा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे.

सात जागा ठरणार कळीचा मुद्दा

तालुका सोसायटी मतदारसंघात प्रत्येक नेत्याची राजकीय ताकद आणि स्थानिक समीकरणे लक्षात घेऊन जागांचे नियोजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शक्य तितक्या जागा बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू असल्या, तरी सर्वसाधारण मतदारसंघातील सात जागांवर अंतिम सहमती झाल्याशिवाय संपूर्ण निवडणूक बिनविरोध करण्याचे गणित जुळणे कठीण असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे आजच्या अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष लढत होणार की सहमतीचे राजकारण यशस्वी होणार, याचे चित्र स्पष्ट होईल.

बिगरशेती मतदारसंघात सचिन जगतापांची चर्चा

सर्वसाधारण मतदारसंघातील बिगरशेती मतदारसंघावर आमदार संग्राम जगताप यांनी विशेष लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले जात आहे. या मतदारसंघातून बंधू सचिन जगताप यांना संधी मिळावी, यासाठी त्यांनी महायुतीच्या पातळीवर प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, शेतीपूरक मतदारसंघातून आमदार आशुतोष काळे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या मतदारसंघात आमदार विवेक कोल्हे यांची भूमिका काय राहणार, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे.

गायकर-पिचड-लहामटे यांच्यात कोण बाजी मारणार?

अकोले मतदारसंघातील राजकीय समीकरणही महत्त्वाचे ठरणार आहे. ज्येष्ठ नेते सीताराम गायकर, माजी मंत्री मधुकर पिचड आणि आमदार किरण लहामटे यांच्यापैकी कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होते, याकडे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातील उमेदवारीचा निर्णय केवळ जिल्हा बँकेपुरता मर्यादित नसून, स्थानिक राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

पारनेर, श्रीरामपूर आणि श्रीगोंद्यातही पेच

पारनेर सोसायटी मतदारसंघातून खासदार नीलेश लंके यांच्यासाठी भाजपमधील एका गटाकडून आग्रह धरला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पारनेरमध्ये अंतिम उमेदवारी कोणाला मिळते, हेही उत्सुकतेचे ठरणार आहे. श्रीरामपूरमध्ये ओबीसी आणि सोसायटी मतदारसंघाचे स्वतंत्र नियोजन सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, श्रीगोंद्याचा तिढा अद्याप कायम आहे. सभापती राम शिंदे जामखेडमधून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट होत असताना कर्जतची जागा कोणाच्या वाट्याला जाणार, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. राहाता, राहुरी आणि श्रीगोंदा या मतदारसंघांमध्ये कोणाला संधी मिळणार, याचीही उत्सुकता आहे.

पाथर्डीत राजळे विरुद्ध ढाकणे?

पाथर्डीमध्ये भाजप आमदार मोनिका राजळे यांचे पारडे सध्या जड मानले जात आहे. मात्र, माजी आमदार प्रताप ढाकणे आणि त्यांचे पुत्र ऋषिकेश ढाकणे यांनीही निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. ढाकणे यांनी जिल्हा बँकेतील एका कारखानदाराच्या कर्जाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राजळे यांचे पारडे जड असले, तरी ढाकणे गटाकडून कोणती राजकीय चाल खेळली जाते, याकडे लक्ष आहे.

नगर तालुक्यात कर्डिले की हराळ?

नगर तालुक्यात भाजप आमदार अक्षय कर्डिले यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, अनुभवी नेते बाळासाहेब हराळ यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघातही ऐनवेळी कोणता निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आजच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष

एकूणच, अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघातील सात जागा हा सत्ताधारी आणि विरोधकांसाठी कळीचा मुद्दा बनला आहे. विखे पाटील-थोरात गटातील जागावाटप, राम शिंदे यांच्यासाठी जागेची मागणी, संग्राम जगताप यांची बंधू सचिन जगताप यांच्यासाठी सुरू असलेली मोर्चेबांधणी आणि विविध तालुक्यांतील स्थानिक राजकीय समीकरणे यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT