Ahilyanagar DCC Bank Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar DCC Bank Election : चिवडा, लाडू, करंजी अन् फटाके! अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फराळाची रंगत

Ahilyanagar District Bank election heats up ahead of November 2 polling as political leaders intensify campaigning, with faral and crackers making headlines : दिवाळीच्या मुहूर्तावर दहा जागांसाठी राजकीय मोर्चेबांधणी; मतदारांच्या भेटीगाठी वाढल्या, बिनविरोधच्या चर्चेनंतरही अनेक ठिकाणी थेट लढती.

Pradeep Pendhare

Ahilyanagar District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या जनरलच्या सहा जागा आणि सोसायटी मतदारसंघातील चार अशा दहा जागांसाठी येत्या 2 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी प्रचार खुमासदार पातळीवर पोहोचला आहे.

मतदारांना मिठाई अन् थेट फटाके पोहोचले जात असल्याचे वृत्त आहे. या मुळे निवडणुकीत चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे, चकली, मिठाईबरोबरच फटाके कोणाकोणाला मिळाले, यावर खुमासदार चर्चा रंगली आहे.

जिल्हा बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीसाठी रविवारपासून ग्रामीण भागात दोनही गटाकडून प्रचारदौरे सुरू करण्यात आले आहे. यात मंत्री विखे पाटील-थोरात आणि माजी मंत्री शंकरराव गडाख गटाच्या उमेदवारांसह शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार नीलेश लंके, प्रतापराव ढाकणे एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे गटाच्या उमेदवार आणि नेत्यांचा समावेश आहे.

जिल्हा बँकेच्या जनरलच्या सहा जागा आणि सोसायटी मतदारसंघातील चार, अशा दहा जागांसाठी येत्या 2 नोव्हेंबर रोजी मतदान (Voting) होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते एका बाजूला असून दुसऱ्या बाजूला शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार नीलेश लंके आणि त्यांची टीम दिसत आहे. खासदार लंकेंबरोबर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी देखील ताकद दिली आहे. त्यामुळे दिवाळीत होत असलेली ही निवडणूक, मतदारांसाठी 'दस की दस उंगलियां घी में', अशी ठरली आहे.

या निवडणुकीत प्रचारासाठी आता काही मोजके दिवस शिल्लक असून पुढील रविवारपर्यंत निवडणुकीतील उमेदवारांना जाहीर प्रचार करता येणार आहे. यामुळे दोन दिवसांपासून निवडणुकीतील उमेदवारांनी मतदारांसह तालुका पातळीवरील नेत्यांच्या भेटीचा धडाका सुरू केला आहे. बिनविरोधच्या सर्वपक्षीय चर्चेनंतर सोसायटी मतदारसंघातील अकोले, कर्जत, पारनेर आणि राहुरी या ठिकाणी निवडणूक लादली आहे.

गुंतागुंतीची श्रीगोंदा बिनविरोध

बिनविरोधसाठी चर्चेच्या अनेक राऊंडनंतर देखील अकोले, पारनेर, कर्जत आणि राहुरी सोसायटी मतदारसंघ बिनविरोध करण्यात जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना यश आले नाही. याला स्थानिक राजकीय स्थिती आणि समीकरणे आडवी आली. जिल्ह्यात सर्वात गुंतागुंतीचे स्थानिक राजकारण श्रीगोंदा होते. त्या ठिकाणी भाजप आमदार विक्रम पाचपुते यांचे बंधू प्रतापसिंह पाचपुते आणि माजी संचालक राहुल जगताप यांच्या उमेदवारीवरून तीव्र स्पर्धा होती. चर्चेच्या गोळाबेरेजत दत्तात्रय पानसरे यांची लॉटरी लागली आणि ते बँकेसाठी बिनविरोध संचालक झाले.

राहुरीत नवा-जुना भाजप आमने-सामने

जिल्ह्यात एका बाजूला निवडणूक बिनविरोध अशी जोरदार चर्चा असताना कर्जत तालुक्यातील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सभापती राम शिंदे समर्थकांमधील तिढा अखेरपर्यंत सुटला नाही आणि त्या ठिकाणी निवडणूक करण्याची वेळ आली. मात्र, या गडबडीत जामखेडची जागा कशीबशी बिनविरोध झाली. राहुरी सोसायटी मतदारसंघात तनपुरे यांना सोपी आणि एकतर्फी असणाऱ्या जागेवर आता पूर्ण तयारीनिशी लढत द्यावी लागणार आहे. या ठिकाणी भाजपमधील नव्या-जुन्या गटात लढत होताना दिसेल.

लहामटेंना गायकरांचे तगडे आव्हान

अकोले तालुक्यात अजित पवार राष्ट्रवादी आमदार किरण लहामटे हे सोसायटी मतदारसंघातून लढत असून, त्यांच्या उमेदवारीला विरोध करणारे भाजपचे माजी आमदार वैभव पिचड हे अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात शिफ्ट झाले आहे. आता आमदार लहामटे यांची लढत माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांच्या कन्येशी होणार आहे. या ठिकाणी लहामटे यांच्या समोर तडगे आव्हान राहणार आहे. यामुळे येथील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पारनेर मतदारसंघात खासदार नीलेश लंके जिंकणार की, विखे पाटील-थोरात सहमती एक्सप्रेस राहुल शिंदेंना ताकद लावून जिंकवणार, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT