Ahilyanagar District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता.2) संगमनेर शहरातील मतदान केंद्रावर प्रक्रिया सुरू असताना, मतदान केल्यानंतर मतदाराने कोणाला मतदान केले, हे दर्शविणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली.
या प्रकाराची माहिती मिळताच सहकार परिवर्तन पॅनलचे प्रताप ढाकणे यांनी थेट मतदान केंद्रावर धाव घेत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी त्यांनी मतदान केंद्रातच आक्षेप नोंदवत संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे थोरात गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. दोन्ही गटांत शाब्दिक वाद झाल्याने काही काळ मतदान केंद्र परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीसाठी सोमवारी संगमनेर शहरातील एका विद्यालयात मतदान प्रक्रिया सुरू होती. याचदरम्यान मतदानाचा व्हिडिओ प्रसारित झाल्याचे समोर आले. या प्रकाराची दखल घेत प्रताप ढाकणे मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे या प्रकाराबाबत विचारणा केली. ‘‘जिल्ह्यातील गुलामगिरी संपवा. ही दादागिरी संपवा. मतदान कोणालाही करा; मात्र अशा प्रकारांना थारा देऊ नका,’’ असे म्हणत ढाकणे यांनी संताप व्यक्त केला.
बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) गटाच्या कार्यकर्ते यावर आक्रमक होत, ‘‘हा व्हिडिओ कधीचा आहे? तुम्ही उमेदवार नाही, मतदारही नाही. मग मतदान केंद्रात येऊन हस्तक्षेप करण्याचा अधिकार काय?’’ असा प्रश्न उपस्थित केला. दादागिरी चालणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
पारनेर तालुक्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदान केंद्राबाहेर खासदार नीलेश लंके आणि मंत्री विखे पाटील समर्थक उमेदवार राहुल शिंदे यांच्याशी संवाद साधला. या वेळी, ‘पारनेर तालुका शांतताप्रिय म्हणून ओळखला जातो. निवडणुकीत राजकीय मतभेद असले, तरी निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडा,’ असा सल्ला झावरे यांनी दोन्ही उमेदवारांना दिला.
राहुरी येथे मतदानानंतर भाजप आमदार प्राजक्त तनपुरे, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांच्यासह त्यांचे समर्थक एकत्र आले होते. या दोघा प्रमुख उमेदवारांनी दुपारी तीननंतर मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी चार वाजता मतदान प्रक्रिया संपली. पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रावर बंदोबस्त होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.